नेहरू सेंटरला युवासेनेचा दणका, छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख ही चूकच; व्यवस्थापनाने केले मान्य

1645

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणार्‍या नेहरू सेंटरच्या व्यवस्थापनाला बुधवारी युवासेनेने चांगलाच जाब विचारला. युवासैनिकांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणांनी सेंटरचा परिसर दणाणून सोडला. त्यावर व्यवस्थापनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ही आमची चूकच असल्याचे मान्य करून ती लवकरात लवकर दुरुस्त केली जाईल असे आश्वासन दिले.

नेहरू सेंटरच्या कलादालनात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला गेल्याने असंख्य शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. या मुद्द्यावरून युवासेनेचे उपसचिव, विभागीय युवा अधिकारी संदीप वरखडे यांच्या नेतृत्वाखालील वरळी विधानसभा क्षेत्रातील युवासेना पदाधिकार्‍यांनी बुधवारी सकाळीच नेहरू सेंटरवर धडक दिली आणि व्यवस्थानाला धारेवर धरले. या वेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असा जयघोष करण्यात आला.

युवासेनेच्या वतीने नेहरू सेंटरचे सहसंचालक चंद्रकांत राणे यांना निवेदन देण्यात आले. त्यावर लेखी स्वरूपात माफीनामा देऊन लवकरात लवकर आम्ही चूक दुरुस्त करू, असे आश्वासन सहसंचालक राणे यांनी दिले. व्यवस्थापनाने वेळीच दुरुस्ती न केल्यास त्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ असा इशारा युवासेनेने दिला. शिष्टमंडळात सहसचिव अश्विनी पवार, राजवी लाड, मुंबई समन्वयक तुषार महाले, उपविभाग युवा अधिकारी संकेत सावंत, विधानसभा चिटणीस नितीन कदम, साईप्रसाद पेडणेकर, विधानसभा समन्वयक सचिन कांबळे व इतर शिवसेना-युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या