पोलिसांकडे तक्रार केली म्हणून आई-मुलाला मारहाण

23

सामना प्रतिनिधी । पुणे

रंगपंचमीच्या दिवशी घरापुढे रंग खेळताना झालेल्या भांडणाची पोलिसांकडे तक्रार केली म्हणून तरुणाला आणि त्याच्या आईला शेजारच्यांनी बेदम मारहाण केली. हे दोघे रुग्णालयातून उपचार घेऊन परत आल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरापुढील दोन दुचाकी, तीन चारचाकींची तोडफोड करून दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन महिलांसह नऊजणांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शंकर जाधव, सुशीला जाधव, बायडाबाई जाधव, सुरेखा जाधव, सूरज जाधव, संजू जाधव, रामा जाधव, महेश जाधव, विष्णू जाधव या नऊजणांवर तोडफोड आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. अद्यापि कोणालाही अटक केलेली नाही. मुकेश काशिद (वय १७, रा. धनकवडी) याने या संदर्भात फिर्याद दिली आहे.

काशिद आणि जाधव हे धनकवडीतील वनशिव वस्ती येथे राहायला आहेत. रंगपंचमीच्या दिवशी काशिद कुटुंबीय जाधव यांच्या घरासमोर रंग खेळत होते. त्यावेळी शंकर जाधव हा दारू पिऊन येऊन त्यांना शिवीगाळ केली. त्यामुळे काशिद यांनी पोलीस चौकीत तक्रार केली. याचा राग मनात धरून जाधव यांनी महेश काशिद आणि त्याच्या आईला बेदम मारहाण केली. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल केला. हे दोघेही रुग्णालयात उपचार घेऊन गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घरी आले. त्यावेळी पोलिसांकडे तक्रार केल्यावरून जाधव कुटुंबीयांनी काशिद यांच्या घरासमोर गोंधळ घातला. काशिदची दुचाकी आणि कार, तसेच त्याने गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आणलेल्या दोन कार होत्या. त्यांच्या काचा फोडल्या. दगडफेक करून दुचाकींचे नुकसान केले. त्यामुळे जाधव कुटुंबीयांवर दंगलीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास उपनिरीक्षक बी. आर. बडे करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या