कुत्र्याला हाकलले म्हणून शेजाऱ्याने तरुणावर गोळ्या झाडल्या

एका तरुणाला कुत्र्याला हाकलवून देणं चांगलच भारी पडलं आहे. भेदरलेला कुत्रा शेजाऱ्याच्या घरात गेल्याने संतापलेल्या शेजाऱ्याने तरुणावर गोळ्या झाडल्याचा भयंकर प्रकार बिहारच्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात कांटी येथे घडला आहे. जखमी तरुणाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कांटी परिसरातील मधुछपरा गांवात शुक्रवारी केशव कुमार या वीस वर्षीय तरुणाने घरासमोर बसलेल्या कुत्र्याला दांडा उगारुन दारातून हाकलले. त्याचा दांडा बघून भेदरलेला कुत्रा शेजारी राहत असलेल्या आरोपी मिथिलेश मिश्रा यांच्या घरात घुसला. त्यावरुन  मिश्रा संतापला व त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मिश्राने रागाच्या भरात त्या केशव कुमारवर गोळी झाडली. त्याच्या पायावर चार गोळ्या लागल्या आहेत.  रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या केशवला रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या केशवला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. तिथून त्याला पुढिल उपचारांसाठी एसकेएमसीएच रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुजफ्फरपूरचे सहाय्यक पोलीस अधिक्षक सैयद इमरान मसूद याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबात जमिनीचा वाद असल्याचेही बोलले जात आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या