माऊंट एव्हरेस्ट एकट्याने सर करण्यास मनाई

सामना ऑनलाईन । काठमांडू

माऊंट एव्हरेस्ट सर करणे हे प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असते. पण जर तुम्ही एकट्याने माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा विचार करीत असाल तर तुम्हाला तुमचा निर्णय बदलावा लागणार आहे. नेपाळच्या पर्यटन विभागाने माऊंट एव्हरेस्टसह सर्व पर्वतशिखरांवर एकट्याने चढाई करण्यास बंदी घातली आहे. चढाई करतेवेळी गिर्यारोहकांचे होणारे अपघात व सुरक्षिततेच्या दृष्टीने नेपाळच्या पर्यटन विभागाने हे निर्णय घेतले आहेत.

नेपाळच्या पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘नेपाळने नवीन सुरक्षा नियमावली बनवली असून त्यात गिर्यारोहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक नवीन नियमांचा समावेश करण्यात आला आहे. यापुढे गिर्यारोहकांमध्ये दिव्यांग तसेच अंध व्यक्तींचा समावेश असल्यास त्यांना गिर्यारोहण करण्यास मनाई केली जाणार आहे. त्याशिवाय यापुढे एकट्या गिर्यारोहकाला नेपाळमधील माऊंट एव्हरेस्टसह कोणतेही पर्वतशिखर एकट्याने चढता येणार नाहीत. गिर्यारोहकांची सुरक्षा ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. असेही नेपाळच्या पर्यटन विभागाने सांगितले आहे’.

२०१७ मध्ये अनेक गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यातील काही गिर्यारोहकांचा अपघाती मृत्यु झाला होता. काही दिवसांपूर्वीच गिर्यारोहणासाठी गेलेल्या सहा जणांचा अपघाती मृत्यु झाल्याचेही समोर आले होते. त्यात ८५ वर्षीय मिन बहादुर शेरचानाचाही समावेश असून त्याला सर्वात जास्त वयाचा गिर्यारोहक बनण्याची इच्छा होती. पण त्याची ही इच्छा पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा मृत्यु झाला. प्रसिद्ध स्विस गिर्यारोहक उली स्टेक चाही एव्हरेस्ट सर करताना मृत्यु झाला. या सर्व घटना लक्षात घेता नेपाळ पर्यटन विभागाने हे निर्बंध लावले आहेत.

‘नवीन नियमावलीनुसार एकट्याने चढाई करण्यास आलेल्या गिर्यारोहकाला आपल्यासोबत गाईड ठेवणे बंधनकारक असणार आहे. नवीन नियमावलीमुळे नेपाळमधील अनेक गाईडला काम मिळण्यासही मदत होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे’. नेपाळच्या पर्यटन विभागाने घेतलेल्या या निर्णयाला नेपाळ सरकारसह अनेकांनी विरोध केला आहे. मात्र नेपाळ पर्यटन विभागाने निर्णय बदलण्यास स्पष्ट नकार दिला आहे.