
चीन आणि पाकिस्तानप्रमाणेच नेपाळचीही हिंदुस्थानबाबत मुजोरी वाढायला सुरूवात झाली आहे. हिंदुस्तानच्या हद्दीत असलेल्या कालापानी, लिपूलेख आणि लिंपियाधुरा या भागांवर नेपाळने आपला दावा सांगितला होता. त्यावेळी हिंदुस्थानने विरोध केला होता. मात्र तरीही नेपाळ सुधारला नसून त्यांनी या भागात जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हिंदुस्थान आणि नेपाळमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात नेपाळच्या मंत्रिमंडळाने एक नकाशा संमत केला होता. या नकाशामध्ये हिंदुस्थानचे कालापानी, लिपूलेख आणि लिंपियाधुरा हे भाग नेपाळमध्ये दाखवण्यात आले होते. यावरून हिंदुस्थानने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मात्र या नाराजीचा नेपाळवर तीळमात्रही परिणाम झालेला दिसत नाहीये. नेपाळमध्ये जनगणना होणार असून कालापानी, लिपूलेख आणि लिंपियाधुरामध्येही ही जनगणना करण्यात येणार आहे. ही जनगणना 11 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे आणि ती 25 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 10 वर्षांनी एकदा होणाऱ्या जनगणनेमध्ये यंदा लोकांसोबत त्यांची इतरही माहिती एकत्रित केली जाणार आहे. या जनगणनेसाठी नेपाळने हिंदुस्थानच्या हद्दीत असलेले 3 भागही घेतले असून त्यातही जनगणना केली जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
नेपाळचा कल गेल्या काही वर्षात हिंदुस्थानऐवजी चीनकडे झुकायला लागला आहे. कालापानी, लिपूलेख आणि लिंपियाधुरा ही गावे अशी आहेत ज्यांच्या सीमा हिंदुस्थान, नेपाळ आणि चीनशी जोडल्या गेलेल्या आहेत. या भागातील जनगणनेबाबत नेपाळचे अधिकारी नवीन लाल श्रेष्ठ यांनी सांगितले आहे की या तीन भागातील जनगणनेबाबत नेपाळच्या परराष्ट्र मंत्रालयाने हिंदुस्थान सरकारला एक निवेदन पाठवले होते, मात्र त्यावर कोणतेही उत्तर आले नाही.