नेपाळचा आता नवा उपद्व्याप, चीनच्या मदतीने तिबेटपासून काठमांडूपर्यंत बांधणार भुयारी रस्ता

नेपाळी पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्या हिंदुस्थानला दुखावणाऱया कुरापती थांबण्याचे लक्षण दिसत नाही. माओप्रेमात आंधळे झालेल्या पंतप्रधान ओली यांनी आता चीनच्या मदतीने तिबेट ते काठमांडू भुयारी मार्ग बनवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. चीनच्या मायाजालात पूर्ण फसत चाललेल्या नेपाळला चुचकारण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून चीन त्यांना हा भुयारी महामार्ग बांधून देणार आहे.

नेपाळचे परराष्ट्र सचिव शंकर दास बैरागी आणि चीनचे उप परराष्ट्र मंत्री ल्यूओ झाओहुई यांच्यात झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये तिबेट -नेपाळ भुयारी मार्गाच्या निर्माणकार्याला उभय देशांनी मंजुरी दिली. चीनने आपल्या हातचे बाहुले बनलेल्या नेपाळी पंतप्रधान ओली यांची खंबीर पाठराखण सुरूच ठेवली आहे. चिनी राजदूतांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन करीत नेपाळच्या सत्ताधारी नेपाळी कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत वादात हस्तक्षेप केला. ओली यांची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी चीन आपली पूर्ण ताकद नेपाळमध्ये लावत असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे.

‘नेपाळी-चिनी भाई भाई’चा नवा अध्याय
पारंपरिक मित्र हिंदुस्थानला डिवचत नेपाळी पंतप्रधान ओली यांची वाटचाल सुरू आहे. त्यातूनच आता ‘नेपाळी -चिनी भाई भाई’चा नवा अध्याय नेपाळने सुरू केला आहे. नेपाळ आणि चीन यांनी प्रत्येक क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरवले असल्याची घोषणा चीनच्या जिनपिंग सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात केली आहे. चीन नेपाळला रस्ते विकास, संरक्षण, कायदा सुव्यवस्था आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगतीसाठी मदत करणार आहे. चीन आणि नेपाळची मैत्री भविष्यात अधिकच घट्ट होईल अशी अशाही चीनने व्यक्त केली आहे. या मैत्रीचा दाखला देत चीनने तिबेट-काठमांडू भुयारी महामार्ग बांधून देण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या