नेपाळमध्ये राजकीय भूकंप, संसदेचे अधिवेशन स्थगित; ओली यांच्या राजीनाम्याची मागणी

1056

हिंदुस्थानच्या विरोधात एल्गार पुकारणारे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीतच दुफळी माजल्याने देशात राजकीय भूकंप आला आहे. पंतप्रधान ओली यांनी कॅबिनेटच्या बैठकीत संसदेचे अधिवेशन स्थगित करण्याचा निणऱय घेतला आणि राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच कम्युनिस्ट पार्टीने पुष्पकमल दहल प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेऊन पंतप्रधान ओली यांच्या एकतर्फी निर्णयाला कडाडून विरोध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

चीनच्या इशाऱयावर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी हिंदुस्थानशी पंगा घेतला. मानसरोवरच्या वाटेवरील लिंपूधारा, कालापानी आदी भूभाग नेपाळच्या नव्या नकाशात दाखवण्यात आला. या नकाशाला संसदेची मंजुरीही घेण्यात आली. पंतप्रधान ओली यांच्या हिंदुस्थान धोरणावरून सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीतच बंडाळी माजली. पुष्पकमल दहल प्रचंड यांनी ओली यांचे धोरण एकतर्फी असल्याचा आरोप करून त्याला विरोध केला. पक्षाचे नेते लीलामणी पोखरेल यांनी पंतप्रधान ओली यांनी हिंदुस्थान आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे, या आरोपाचे पुरावे त्यांनी द्यावेत अशी मागणी केली. तर पेशाल खाटीवाडा यांनी ओली यांनी राजीनामा द्यावा असे म्हटले. प्रसीन व योगेश भट्टराय यांनी ओली यांनी कामकाजात सुधारणा करावी असे सुचवले.

ओली रुग्णालयात
पक्षातच दुफळी माजल्याने अडचणीत आलेले पंतप्रधान ओली यांची प्रकृती बिघडली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या बैठकीलाही ते आले नाहीत. पक्षातील विरोधकांना त्यांनी चर्चा करण्यासाठी बोलावले, परंतु त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. सगळीकडून कोंडी झालेले ओली रात्री उशिरा शहीद गंगालाल रुग्णालयात भरती झाले. मात्र ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते असे त्यांच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या