नेरळ: बिल्डिंग साईटवरील खड्ड्यात पडून दोन मुलीचा बुडून मृत्यू

60

सामना ऑनलाईन । कर्जत

नेरळमध्ये इमारतीच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात कपडे धुवण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बिल्डरने एक एकर जागेत खड्डा खोदला असून त्या खड्ड्यात कपडे धुण्यासाठी त्या मुली आपल्या आईसह गेल्या होत्या. या घटनेमुळे त्या भागातील लोक प्रचंड संतप्त झाले असून बिल्डरवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून काही काळ नेरळमध्ये तणाव निर्माण झाला होता.

नेरळच्या साईमंदिर परिसरात भागीत चाळीमध्ये संजीव सुरे यांचे कुटुंब राहते. वडार काम करणारे हे कुटुंब दगडी फोडून पाटे, उखळ, वरवंटे घडविण्याचे काम करतात. संजीव शेषराव सुरे हे त्या ठिकाणी भाड्याच्या खोलीत आई, पत्नी आणि तीन मुलांसह राहत होते. घरापासून २०० मीटर अंतरावर खड्यात भरपूर पाणी साचले असल्याने सुरे आणि त्या ठिकाणाची अनेक कुटुंबे त्या खड्ड्यात जाऊन कपडे घुणी करायची. शनिवारी दुपारी दीडच्या दरम्यान कमल संजीव सुरे या आपल्या तिन्ही मुलांसह कपडे घुण्यासाठी गेल्या होत्या. त्यातील सुरे यांचा मुलगा निलेश हा थोडेसे भिजून घरी परतला, मात्र त्याच्या दोन्ही बहिणी या पाण्यात उतरून खेळत होत्या. त्या दोघी पाण्यात पोहत असल्याने त्यांची आई कपडे धुण्यात मग्न होती. मात्र संगीता संजीव सुरे आणि पूजा संजीव सुरे या विस्तीर्ण पसरलेल्या पाण्यात कुठेही दिसेनाशा झाल्याने कपडे घुण्यासाठी आलेल्या महिला घाबरल्या आणि त्यांनी घरी भागीत चाळीत जाऊन सर्व हकीकत सर्वांना सांगितली.

अडीचच्या दरम्यान ही घटना घडली असता काही वेळातच नेरळ पोलिसांना माहिती मिळताच ते तेथे पोहचले. त्यांनी दहिवली ग्रामपंचायत मधील शेंडेवाडी मधील पोहणारे यांना बोलावून घेतले. धर्मा रावजी शेंडे, दत्तात्रय गजानन शेंडे आणि तुळशीराम नारायण गिरा या तिघांनी पाण्यात उतरून शोध मोहीम सुरू केली असता जमिनीपासून तब्बल ४० फूट खोल त्या दोन्ही मुली पाण्यात असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावर त्यांनी बांबूच्या काठ्या घेऊन बुड्या मारून पहिले १२ वर्षीय पूजा संजीव सुरे हिला आणि नंतर काही वेळात ९ वर्षाची संगीता संजीव सुरे हिला बाहेर काढले. या दोघी बुडल्या त्या ठिकाणी पाण्यात मातीचा गाळ असल्याने त्यांचे पाय चिखलात रुतले असल्याने त्यांचे मृतदेह पाण्याबाहेर येऊ शकले नव्हते.

मृतदेह बाहेर काढल्यानंतर बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून मृतदेह जागेवरून उचलण्यास तिथे जमलेल्या नागरिकांनी विरोध केला. त्याचवेळी स्थानिकांनी पोलिसांना श्रीजी बिल्डरचे मालक ठाकूर यांना हजर करण्याची मागणी केली. शेवटी पोलिसांनी बिल्डरचे या साईटचे काम पाहणारे शेखर घाडगे यांना पोलीस ठाण्यात नेले आणि बिल्डरवरच गुन्हा दाखल होईल असे आश्वासन सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी दिले. त्यामुळे दोन्ही मृतदेह कर्जत येथे शवविच्छेदन करण्यासाठी पाच वाजता रवाना करण्यात आले. परंतु त्या शवविच्छेदन पूर्ण होण्याआधी बिल्डरवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर मृतदेह कर्जत येथून नातेवाईक ताब्यात घेणार नाहीत असे स्पष्टपणे त्या दोन्ही मुलींच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे युक्ती डेव्हलपर्सच्या श्रीजी गृहसंकुल उभारण्यासाठी जमीन खरेदी करणारे राजेश ठाकूर यांच्यावर नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या