नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलणार! अस्थींची डीएनए चाचणी करण्याची अनिता बोस यांची विनंती

301

जपानच्या मंदिरात ठेवलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थींची डीएनए चाचणी करावी, अशी विनंती त्यांची कन्या अनिता बोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलले जाऊ नये, असे आधीच्या सरकारला वाटत होते. त्यामुळे त्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले, असा आरोप बोस यांनी केला. या प्रकरणात मोदी सरकारने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

नेताजींच्या अस्थिची डीएनए चाचणी व्हावी, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची इच्छा अनिता बोस यांनी व्यक्त केली. रेनकोजी मंदिरातील अस्थिंबाबत जपानच्या अधिकाऱ्यांना भेटून बोलण्याची विनंतीही त्या करणार आहेत. जोपर्यंत आणखी काही वेगळे सिद्ध होत नाही, तोपर्यंत वडिलांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 रोजी विमान अपघातात झाला, असेच मला वाटत राहील. मात्र अनेक जण ही गोष्ट स्वीकारण्यास तयार नाहीत. मला निश्चितच वाटतंय की नेताजींच्या  मृत्यूचे रहस्य सोडवले जावे, असे बोस म्हणाल्या.

नेताजींच्या मृत्युप्रकरणात केंद्र सरकारच्या ताब्यात असलेल्या फायली सार्वजनिक करण्याच्या प्रयत्नांबद्दल अनिता बोस यांनी मोदी सरकारचे आभार मानले आहेत. जपानी अधिकाऱ्यांनीही त्यांच्याकडे काही फायल असतील तर त्या सार्वजनिक कराव्यात, अशी विनंती त्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या