बिल्डिंग माफियांचा माज, नेताजी बोस यांच्या कुटुंबीयांना धमकावलं

19

सामना ऑनलाईन । कोलकाता

घर रिनोव्हेट करण्यासाठीचं सामान आमच्याकडून का घेतलं नाही? असा सवाल करत आता परिणाम भोगावे लागतील अशी धमकी बिल्डिंग माफियांनी थेट नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांना दिल्याची घटना समोर आली. देशासाठी बलिदान देणाऱ्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांची ही अवस्था तर सामन्यांचे काय? असा सवाल आता विचारला जात आहे.

सुभाषचंद्र बोस यांचे नातू आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सुगाता बोस यांच्या घरी सोमवारी दुपारी १:३० च्या सुमारास १०-१२ युवक आले. त्यावेळी सुगाता यांची आई (वय ८६) घरी होती. या युवकांनी सुगाता यांची चौकशी केली आणि धमकावले. या भागात राहून देखील तुमच्या मुलानं आमच्याकडून बांधकामाचे साहित्य का घेतले नाही, आमच्याशिवाय घर रिनोव्हेट करण्याचे काम सुरूच कसे केले?, असा सवाल केला. तसेच आता ‘परिणाम भोगावे लागतील’, असेही धमकावले.

दरम्यान, याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या