हमासचा शांततेचा प्रस्ताव नेतान्याहूंनी धुडकावला, गाझावर आक्रमणाची इस्रायलची तयारी

‘आता आम्ही थांबणार नाही’ असं म्हणत इस्रायलने गाझापट्टीवर आक्रमणाची तयारी सुरू केली आहे. हमासने इस्रायलपुढे शांततेचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी धुडकावून लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये सुरू असलेली धुसफूस सोमवारी युद्धजन्य परिस्थिती परावर्तित झाली आहे.

पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने आणि इस्रायलच्या सैन्याने एकमेकांवर प्रत्येकी किमान 1000 क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये हमासचेच जास्त नुकसान झाल्याचे दिसते आहे. क्षेपणास्त्रांमुळे 10 लहान मुलांसह गाझापट्टीतील 67 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये हमासचे प्रमुख म्होरके ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 जण मृत्यूमुखी पडले आहेत, यामध्ये एका हिंदुस्थानी महिलेचाही समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय समूहाने इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील संघर्ष निवळावा यासाठी प्रयत्न केलेत. इस्रायलने भूमिका मवाळ करावी अशी मागणी विविध देशांनी केली आहे, मात्र इस्रायल ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. तिथले पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आमचे सैन्यदल दीर्घ मोहिमेसाठी सज्ज आहे आणि आम्ही आमची ताकद वाढवत नेऊ असं म्हटलं आहे.

इस्रायलमधील एका मंत्र्याने वायनेट नावाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलंय की विरोधकांच्या प्रमुख ठिकाणांवर आम्ही हल्ले केलेत, तरीही ते शरण येत नाहीयेत यामुळे आता आमची इच्छा नसतानाही आम्हाला भूभागावरील मोहिमेला सुरुवात करावी लागणार आहे. भूभागावरील आक्रमण कसे असावे याचा एक आराखडा तयार करण्यात आला असून तो तिथल्या सैन्यप्रमुखांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांनी आराखड्यावर सही केल्यानंतर हा आराखडा मंजुरीसाठी इस्रायलच्या मंत्रिमंडळापुढे ठेवण्यात येईल.

इस्रायलच्या संरक्षण दलाने दावा केला आहे. की त्यांनी गाझा पट्टीतील 650 ठिकाणांना आपले लक्ष्य केले असून त्यांच्या हवाई हल्ल्यात हमासला मोठा हादरा बसला आहे. या हल्ल्यात हमासचा ब्रिगेडीअर जनरल बास्सेम इसा, गाझा ब्रिगेड प्रमुख जमाल झाबदाक्षेपणास्त्र दलाचा प्रमुख यांचा खात्मा झाला आहे. हवाई हल्ल्यामध्ये गाझा पट्टीतील काही सरकारी कार्यालये, बँकांच्या इमारतीदेखील उध्वस्त झाल्या आहेत असाही दावा इस्रायलच्या संरक्षण दलाने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या