सहकार खात्यातील विशेष लेखापरीक्षकासह दोघांना अटक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लेखापरीक्षणात तक्रारदार व नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवीच्या रकमा व्याजासह अहवालात दाखविणे, तसेच चांगला लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यासाठी तीन लाखांची लाच स्वीकारणाऱ्या सहकारी संस्थांच्या विशेष लेखापरीक्षकासह खासगी लेखापरीक्षक अशा दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नेवासा फाटा येथील ‘बाळूमामा ज्यूस सेंटर’मध्ये सोमवारी ही कारवाई करण्यात आली.

नगर जिल्हा विशेष लेखापरीक्षक कार्यालयातील सहकारी संस्थांचे विशेष लेखापरीक्षक किसन दिगंबर सागर (वय 55, रा. सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर), खासगी लेखापरीक्षक तय्यब वजीर पठाण (वय 48, रा. जवळे खुर्द, ता. नेवासा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे एका पतसंस्थेचे चेअरमन होते. या पतसंस्थेचे लेक्षापरीक्षक करून अहवाल सादर करण्याचे आदेश सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधकांनी दिले होते. दरम्यान, तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावरील मुदत ठेवींची रक्कम व्याजासह अहवालात दाखविणे व लेखापरीक्षणाचा चांगला अहवाल सादर करण्यासाठी सागर व पठाण यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी (17 रोजी) केलेल्या पडताळणीत तडजोडीअंती दोन लाखांची मागणी केल्याचे सिद्ध झाले. यातील एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना सागर आणि पठाण यांना नेवासा फाटा येथील ‘बाळूमामा ज्यूस सेंटर’मध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी नेवासा तालुका पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिला वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक पोलीस हवालदार हारून शेख, दशरथ लाड या पथकाने ही कारवाई केली आहे. दरम्यान सहकार खात्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला लाचप्रकरणात अटक झालेल्या जिह्यातील सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे.