नेवाशात ‘सैराट’चा प्रकार, मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने जावयाच्या खुनाचा प्रयत्न, सातजणांवर गुन्हा दाखल

murder-knife

मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग येऊन नातेवाईकांसह येऊन आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या जावयास त्याच्या घरासमोर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेवासा शहरात घडली आहे.

नेवासे येथील बंटी ऊर्फ प्रशांत राजेंद्र वाघ याचे व पाथर्डीतील माणिक खेडकर यांच्या मुलीसोबत 1 मार्च रोजी आंतरजातीय विवाह झाला. या विवाहाला मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. शनिवारी दुपारी नेवासे पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावरील कडू गल्ली येथे वाघच्या घरासमोर तीन-चार चारचाकी वाहने आली. एका गाडीतून मुलीचे वडील माणिक खेडकर, भाऊ ऋषिकेश खेडकर व एक अनोळखी उतरले. दरवाज्यात उभ्या असलेल्या प्रशांतला हत्याराचा वार केला; परंतु मध्ये दुचाकी असल्याने वार चुकला. त्यामुळे प्रशांत जिवाच्या आकांताने ओरडत घरात पळाला. यावेळी मुलीच्या भावाने त्याच्याकडील पिस्तुल रोखले. इतर गाडय़ांतून आलेल्या व्यक्तींच्या हातात चाकू, रॉड, एअरगन होते. यावेळी याला मारा, सोडू नका, असे माणिकराव खेडकर ओरडून सांगत होते.

प्रशांतच्या ओरडण्याने गल्लीतील लोक जमा झाले. हे पाहून आरोपी आपापल्या गाडीत बसून नेवासे फाट्याच्या दिशेने पळाले. प्रशांतने पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिसांनी तत्परता दाखवून भानस हिवरा रोडवर हॉटेल सावताजवळ आरोपींना पकडले. पोलिसांनी तीन गाड्यांसह सातजणांना ताब्यात घेतले. परंतु, माणिक कोंडिबा खेडकर, ऋषिकेश खेडकर व त्यांचा भाऊ हे वेगळ्या वाहनाने फरार झाले आहेत. सध्या सातजणांविरुद्ध जिवे मारण्यासह आर्म्स ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विजय करे तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या