नवे शैक्षणिक वर्ष सुरू; पहिलीत 751 विद्यार्थ्यांचा प्रवेश, देवगड तालुक्यात 207 शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

मे महिन्याची सुटी संपली असून आणि शनिवारपासून शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. देवगड तालुक्यातील 207 शाळांमध्ये नवीन विद्यर्थ्यांचे औक्षण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यंदा पहिलीमध्ये 751 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी दिली.

उन्हाळी सुटी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्ष शनिवार 15 जूनपासून सुरू झाले आणि शाळांची घंटा वाजली. शाळेमध्ये नव्याने दाखल झालेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत विविध उपक्रमांनी करण्यात आले. प्रभात फेरी काढून वाजत गाजत विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन औक्षण करत, तर काही ठिकाणी शाळांमध्ये रोपवाटप करून स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत मुलांना पोषण आहार देण्यात आला, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी दिली. 207 शाळांमधील विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले.