नवजात बालकांची विक्री करणारी टोळी गजाआड; डॉक्टर,नर्स, लॅब टेक्निशियनचा समावेश

गर्भवती राहिल्यानंतर बाळ नको अशी मनस्थिती असतानाही नंतर बाळाला जन्म देऊन त्यांची मध्यस्थांमार्फत विक्री करणाऱया दोघा मातांसह नवजात बाळं बाळांची खरेदी विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट-1 च्या पथकाने गजाआड केले आहे. त्या टोळीत डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन यांचाही समावेश आहे.

खेरवाडी परिसरात राहणाऱया काही महिला त्यांची स्वतःची नवजात बालके महिला एजंटच्या माध्यमातून विकत असल्याची खबर युनिट-1 ला मिळाली होती. त्यानुसार प्रभारी निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तत्काळ तपास हाती घेऊन तीन महिलांना ताब्यात घेतले.

त्यानंतर या प्रकरणात नावे समोर येत गेली तसे पोलिसांनी नऊ जणांना बेडय़ा ठोकल्या. त्यात वरळी-लोअर परळ दरम्यान क्लिनिक चालविणारा डॉक्टर धनंजय बोगा, नर्सचे काम करणारी गितांजली गायकवाड, लॅब टेक्निशियनचे काम करणारी आरती सिंग यांच्यासह नवजात बाळं विकण्यात एजन्टचे काम करणाऱया रुपाली वर्मा, मुंब्य्रात राहणारी गुलशन शेख, दिव्यात राहणारी निशा अहिरे यांचा समावेश आहे.

आरोपी दोन अडीच लाखात बाळांना विपून जन्मदात्या मातेला 60 ते 70 हजार रुपये द्यायचे. या आरोपींनी गैरमार्गाने अनेक बाळांची खरेदी विक्री केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

महिला मास्टरमाइंड फरार

या गुन्ह्यात एक महिला एनजीओ चालवित असल्याचे सांगून नवजात बाळांची खरेदी विक्री करीत असल्याची माहिती समोर आली आहे.मात्र ती फरार झाल्याने पोलिसांच्या हाती लागू शकली नाही. तीच या गुह्याची मास्टरमार्इंड असून तिने अनेक नवजात बालकांची खरेदी-विक्री केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस तिचा शोध घेत आहेत.

रुपाली वर्मा हिला खेरवाडीतील एक महिला गर्भवती असून तिला बाळ नको असल्याची माहिती मिळाली. तेव्हा तिने मध्यस्थी करीत बाळाला जन्म देण्यास व ते नंतर विकण्यास संबंधित महिलेला तयार केले. त्यानुसार त्यांनी पहिल्या मुलीला 70 हजारात तर दुसऱया वेळेस झालेल्या मुलाला दीड लाखात विकले. यात रुपालीला गुलशन, निशा आणि गिताजंलीने मदत केली.

दरम्यान, दुसऱया महिलेने देखील तिचे नवजात बाळ धारावीत एकाला विकले होते. त्या महिलेला देखील बाळ नको होते. ही बाब तिच्या शेजारी राहणाऱया महिलेला कळताच तिने बाळाला जन्म देण्यास सांगून ते बाळ तिच्या धारावीत राहणाऱया व गेल्या दहा वर्षांपासून बाळ होत नसलेल्या बहिणीला विकण्यास तयार केले. त्यानुसार त्या मातेने 60 हजारात तिच्या मुलाला विकले होते. गिंताजली हिने चार बालकांची मुंबई, पुण्यात विक्री केल्याचे समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या