आईलाच झाली नकोशी, जन्मानंतर जंगलात दिले सो़डून

73

सामना प्रतिनिधी । कवठे येमाई

काठापुर खुर्द ता. शिरूर येथे रस्त्यांच्या कडेला एक स्त्री जातीचे नवजात अर्भक सापडले असून, ग्रामस्थांनी त्या चिमुकलीला तत्काळ रुग्णालयात दाखल करत तिचे प्राण वाचविले आहेत.

याबाबत काठापुरचे सरपंच बिपीन थिटे यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार, काठापुर -शिंगवे पारगाव रस्त्याच्या कडेला शेताच्या बांधावर हे नुकतेच जन्मलेले हे अर्भक एका साडीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते. यशवंत केदारी व सुशिलाबाई झिंग्रे हे शेतात काम करण्यासाठी गेले असता त्यांना ते बाळ दिसले. त्यानंतर सरपंच बिपीन थिटे यांच्यासह विकास दाते, संभाजी लोंढे, पोलिस पाटील सर्जेराव बोऱ्हाडे हे तत्काळ बाळाला घेऊन टाकळी हाजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गेले. तेथे वैद्यकीय अधिकारी कृष्णा चव्हाण व यांनी बाळाची तपासणी करत तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. या बाळाचा जन्म पहाटेच्या सुमारास झाला असण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. या बाळाला बेवारसपणे टाकुन दिल्या प्रकरणी अज्ञात पालका विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बागायती भागामधील ही दुदैवी घटना
टाकळी हाजी बेट भागासह काठापुर हे समृद्ध गाव असून या भागामधे प्रथमच मुलगी झाली म्हणुन रस्त्यावर टाकुन देण्याची घटना घडली आहे. हा प्रकार अत्यंत दुर्देवी असल्याची प्रतिक्रीया जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना मुलगी नकोशी झालीय तिच्या शिक्षणासह लग्नापर्यंतचा खर्च मी स्वतः करते पण मुलीला असं रस्त्यावर टाकू नका असं आवाहन त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या