मुंबई ते दिल्ली नवीन स्वस्त आणि फास्ट राजधानी

48

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबई ते दिल्ली असा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे. रेल्वेने १६ ऑक्टोबरपासून हजरत निजामुद्दीन स्थानक दिल्ली ते वांद्रे टर्मिनस अशी नवीन राजधानी एक्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दिल्लीचा प्रवास आता दोन तासांनी कमी होणार असून तिकिटांची किंमतदेखील ६०० ते ८०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. या मार्गावर दोन राजधानी याआधीच धावत आहेत.

ही स्पेशल राजधानी सुरुवातीला तीन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर १६ ऑक्टोबर ते १६ जानेवारीदरम्यान चालविण्यात येणार असून सध्याच्या पायाभूत तंत्रज्ञानावर आणि डब्यांद्वारे प्रवासाचा वेळ दोन तास कमी करण्याचा विचार असल्याचे रेल्वे बोर्डाचे सदस्य ट्रफिक मोहम्मद जमशेद यांनी म्हटले आहे. सध्या या मार्गावर ऑगस्ट क्रांती राजधानी आणि मुंबई सेंट्रल-नवी दिल्ली राजधानी धावत आहेत. ऑगस्ट क्रांती राजधानीला दिल्ली गाठण्यासाठी १७ तासांचा कालावधी लागतो, तर मुंबई सेंट्रल दिल्ली राजधानी हे अंतर कापण्यास १६ तास लागतात.

अवघ्या १४ तासांत अंतर कापणार
नवीन राजधानी एक्प्रेस दोन शहरांतील १३६५ कि.मी.चे अंतर ताशी कमाल १३० कि.मी. वेगाने अवघ्या १४ तासांत कापणार असून तिला कोटा, वडोदरा आणि सुरत हे तीनच थांबे असणार आहेत. सकाळचे ट्रफिक टाळण्यासाठी ही ट्रेन सकाळी ६ वाजता या दोन महानगरांत पोहचणार आहे. दिल्लीहून दर बुधवार, शुक्रवार आणि शनिवार तर वांद्रेहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार ही ट्रेन धावणार आहे.

राजधानी         सध्याचे भाडे      नवीन भाडे
सेकंड एसी          ४१०५              ३२७०
थर्ड एसी             २९२५             २३२५

आपली प्रतिक्रिया द्या