कैद्याने गिळले चार मोबाईल, एक गेला पोटात

690

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नवी दिल्लीतील हर्ष विहार येथील मंडोली तुरुंगात एका कैद्याने एक दोन नाही तर चक्क चार मोबाईल गिळल्याची धक्कादायक घटना घडली. कैद्याने उलटी करून तीन मोबाईल बाहेर काढले. मात्र चौथा मोबाईल थेट पोटात गेला. त्यामुळे पोटात दुखू लागल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करुन चौथा मोबाईल डॉक्टरांनी बाहेर काढला. अनुज (25) असे या कैद्याचे नाव आहे. दरम्यान,कैद्याने चार मोबाईल गिळल्याची ही देशातील पहीलीच घटना आहे.

अनुज या कैद्यावर अनेक गुन्हे दाखल असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे. तुरुंगात मोबाईल बाळगण्याची परवानगी नसतानाही अनुजने चार मोबाईल बाळगले. याबद्दल तुरुंगाधिकाऱ्यांना कुणकुण लागताच त्यांनी कैद्यांची तपासणी सुरू केली. यामुळे अनुजने चारही मोबाईल गिळले. पण उलटी करत त्याने तीन मोबाईल बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा उलटी करताना चौथा मोबाईल त्याच्या पोटात गेला. पण याबद्दल त्याने कोणासही काही सांगितले नाही. मात्र काही वेळाने त्याला पोटात भयकंर दुखू लागले. वेदना असह्यय झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला डॉक्टरांना अनुजच्या पोटदुखीचे नेमके कारण कळत नव्हते. यामुळे त्यांनी त्याच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या केल्या. सोनोग्राफीमध्ये मात्र पोटात धातूचा एक मोठा तुकडा असल्याचे व तो मोबाईल सदृश्य दिसत असल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी अनुजच्या पोटावर शस्त्रक्रिया केली. त्यावेळी त्याच्या पोटातून दोन सेंटीमीटर आकाराचा मिनी मोबाईल बाहेर काढला. हा मोबाईल चिनी बनावटीचा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या