हिंदुस्थानी बनावटीचे ‘2-डीजी’ करणार कोरोनावर हल्ला‘डीआरडीओ’ची औषधी पावडर बाजारात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर भर देण्यात येत असताना देशाची संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)ने कोरोनाला रोखण्यासाठी ‘2-डीजी’ हे स्वदेशी औषध बाजारात आणले आहे. पावडरच्या स्वरूपात असलेले हे औषध बाजारात आणल्याची घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी नवी दिल्ली येथे केली.

डीआरडीओने विकसित केलेले अॅण्टी-कोविड औषध 2 -डीऑक्सी-डी-ग्लुकोज (2-डीजी) च्या 10 हजार डोसची पहिली मात्रा सोमवारी आपत्कालीन वापरासाठी बाजारात आणली आहे. हे औषध कोरोना रुग्ण त्वरित बरे करते आणि ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे. हे औषध पावडरच्या स्वरूपात असून एका पॅकेटमध्ये येते. ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर प्यावे लागते. हे औषध सुरुवातीला दिल्लीतील डीआरडीओ कोरोना रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना दिले जाणार आहे. देशभरात सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड्सची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत हे औषध सर्वांसाठी आशेचा मोठा किरण ठरणार आहे.

हे औषध डीआरडीओच्या पथकाने विकसित केले आहे. डॉ. सुधीर चंदना, डॉ. अनंत नारायण भट्ट आणि डॉ. अनिल मिश्रा यांचा यात सहभाग होता. डॉ. रेड्डीज या फार्मा पंपनीच्या सहकार्याने हे औषध तयार केले आहे. या औषधामुळे रुग्णांचे ऑक्सिजनवर अवलंबून राहण्याचे प्रमाण कमी होणार असून बरे होण्याचा वेग वाढणार आहे. बरे होण्यासाठी रुग्णांना आधीपेक्षा 2-3 दिवस कमी लागणार आहेत, असा दावा डीआरडीओने केला आहे. हे औषध घेतलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाच्या लक्षणांमधे तीव्र घट झाल्याची नोंद झाली. 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोरोना रुग्णांमध्येही याचे चांगले परिणाम पाहायला मिळाले.

औषध नेमके कसे काम करते

डीआरडीओच्या इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिनअॅण्ड अलाइड सायन्सेसच्या प्रयोगशाळेत तयार केलेले हे औषध ग्लुकोजचे एक सब्स्टिटय़ूट आहे. हे स्ट्रक्चरल ग्लुकोजसारखे आहे, परंतु प्रत्यक्षात ते वेगळे आहे. हे पावडर स्वरूपात आहे आणि पाण्यात विरघळून रुग्णांना दिले जाते. कोरोना विषाणू त्यांच्या ऊर्जेसाठी रुग्णाच्या शरीरातून ग्लुकोज घेतात तर हे औषध केवळ संक्रमित पेशींमध्येच साठवले जाते. कोरोना विषाणू ग्लुकोज म्हणून हे औषध वापरण्यास सुरुवात करतात. अशा प्रकारे विषाणूंना ऊर्जा मिळणे बंद होते आणि त्यांचे विषाणूजन्य संश्लेषण थांबते. म्हणजेच नवीन व्हायरस तयार होण्याची प्रक्रिया थांबते आणि उर्वरित व्हायरसदेखील मरतात. प्रत्यक्षात हे औषध कर्करोगाच्या उपचारांसाठी तयार केले जात होते.

आपली प्रतिक्रिया द्या