दिल्लीत दारूवर 70 टक्क्यांचा कर, तरीही लोक म्हणतात हरकत नाही! पाहा व्हिडीओ

827

केंद्र सरकारतर्फे दारूच्या दुकानांना विक्रीसाठी परवानगी देण्यात आल्यानंतर मद्यपींच्या गोटात आनंद पसरल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारपासून कुठे शिस्तीत तर कुठे झुंबड अशा परिस्थितीत दारू विक्री सुरू झाली आहे. नवी दिल्लीत महसुलाची तूट भरून काढण्यासाठी दारूवर 70 टक्के इतका कर लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यानंतरही दारू विक्रीत घट झाली नसल्याचं वृत्त आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, नवी दिल्लीतील दारूच्या दुकानांवर खरेदी करणाऱ्या एका माणसाने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. कर जास्त असला तरी तो द्यायला आमची काही हरकत नाही. ही एक प्रकारची देणगीच आहे, असं त्याचं म्हणणं आहे. वाईन शॉप्सच्या बाहेर जरी बरीच गर्दी दिसत असली आणि सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजत असले तरी, ते पाहणं सरकारचं काम असल्याचं या व्यक्तिचं म्हणणं आहे.

अन्य एका व्हायरल व्हिडीओमध्ये काही लोक दारूच्या दुकानाच्या बाहेर रांगेत उभ्या असलेल्यांवर पुष्पवर्षाव करत असल्याचं दिसून येत आहे. या प्रकाराचं स्पष्टीकरण देताना पुष्पवर्षाव करणारी व्यक्ती म्हणते की, हे लोक आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर पुष्पवर्षाव करत आहोत. हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर लोकप्रिय झाले असून त्याच्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या