खेडमध्ये रामगड नावाच्या एका किल्ल्याचा नव्याने शोध, दुर्ग अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासक यांचे यशस्वी संशोधन

दापोली तालुक्यातील पालगड गावानजिक दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सिमेवर रामगड नावाच्या एका किल्ल्याचा दुर्ग अभ्यासक संदिप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर एका किल्ल्याचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

सुप्रसिद्ध शामची आई या अजरामर पुस्तकाचे लेखक असलेल्या पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांच्या दापोली तालुक्यातील पालगड या जन्मगावाच्या पूर्वेस दापोली-खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर समुद्रसपाटीपासून अंदाजे 390 मीटर (1280 फूट) उंचीवर असलेला छोटेखानी किल्ला वसला आहे, मात्र या किल्ल्याबाबत लोकांना माहिती नाही. या किल्ल्याचा अभ्यास आणि अथक प्रयत्नाने संदिप परांजपे आणि डॉ. सचिन जोशी यांनी या ऐतिहासिक ठेव्याचा शोध लावला. ‘रामगड’, असे या किल्ल्याचे नाव आहे. दुर्ग अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासक यांनी शोधलेल्या रामगड किल्ल्यामुळे ऐतिहासिक वारशाच्या इतिहासाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे.

रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला रामगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोडतो, तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोडतो. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याविषयी आजतागायत कोणालाच माहिती नाही, मात्र पालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा. दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीत अनेक समान गोष्टी दिसतात. या किल्ल्यांचे उल्लेख 1728 पासून मिळतात. या किल्ल्याचे उल्लेख असलेली दोन- तीन कागदपत्रे उपलब्ध असून यातील पहिली नोंद 1728 मधील यादी आहे. ही यादी ऐतिहासिक संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेली असून त्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांची यादी दिलेली आहे. या यादीत रामगड किल्ल्याचा उल्लेख पालगडबरोबर झालेला असून तो रामदुर्ग असा येतो.

पुढील दोन्ही पत्रे पेशवे दप्तरातील असून ती अनुक्रमे 1745 आणि 1818 मधील आहेत. यातील पहिले पत्र कोणी कोणास पाठवले याचा उल्लेख प्रस्तुत खंडातील प्रसिद्ध लेखात नाही, मात्र रत्नागिरीमधील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडबरोबर पेशव्यांच्या ताब्यात आला असावा, असे या पत्रावरून समजते. मार्च 1818 मधील असून या पत्रात इंग्रजी फौजा पालगड व रामगड येथे पहाटेपासून तोफांचा मारा करत असून किल्ल्यावर लागलेली आग खूप दुरून दिसत असल्याचे म्हटले आहे. हे पत्र धोंडो विश्वनाथाने निळोपंत पुरंदर यांना पाठवले आहे, मात्र सदर पत्रावरून रामगड व पालगड हे दोन्ही किल्ले एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. पालगड आणि रामगड किल्ल्याच्या भोवती एकूण पाच माच्या असून रामगड माची आहे. ही रामगड माची किल्ल्याच्या पश्चिमेस असून सध्या ती राणी माची या नावाने ओळखली जाते.

किल्ल्याची सॅटेलाईट इमेज बघता पालगडच्या पश्चिमेकडे एक उंचवटा असून त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. आकाराने अतिशय छोट्या माथ्यावर हे बांधकाम केलेले दिसून येते किल्ल्याच्या सर्वेक्षणात किल्ल्याचा दरवाजा त्याचे 2 संरक्षक बुरुज, चहू बाजूस असलेली रुंद तटबंदी तसेच तटबंदीतील 4 बुरुज, किल्ल्याच्या आतील बाजूस एक सुटा बुरुज, अंदमासे 6- 7 इमारती काही थडगी, भांड्यांचे तुकडे मिळाले असून किल्ल्याची तटबंदी व दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत.किल्ल्यावर मोठ्याा प्रमाणात पालापाचोळा आणि झाडे झुडपे वाढलेली असल्यामुळे किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था काय होती हे समजले नाही. किल्ल्यातील साफसफाई केल्यावर अजून अवशेष उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू, या दुर्गावरील साफसफाईचे काम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी केले तसेच मोडी अभ्यासक राज मेमाणे यांचीही या कामी मोडी लिपीतील कागदपत्रे पडताळ्यासाठीची मोठी मदत झाली असल्याची माहिती पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन विद्याधर जोशी यांनी ‘सामना’ ला दिली.