मंत्रालयात प्रवेशासाठी दक्षिणायन

सामना ऑनलाईन । मुंबई

राजकीय नेत्यांच्या दृष्टीने अशुभ वाटणाऱ्या मंत्रालयाच्या दर्शनी भागातील पायऱ्या तोडल्यानंतर आता मोकळ्या झालेल्या दर्शनी भागातून थेट मंत्रालयात जाण्यासाठी व्हीव्हीआयपी गेट सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. दक्षिण दिशेकडून वास्तूमध्ये प्रवेश नको म्हणून पायऱ्या तोडण्यात आल्या, पण आता पुन्हा दक्षिणेकडून प्रवेशद्वार करण्याची योजना सुरू आहे.

मंत्रालयाच्या इमारतीला 2012मध्ये भीषण आग लागली होती. त्यानंतर सुमारे 150 कोटी रुपये खर्च करून मंत्रालयाचे नूतनीकरण केले. या नूतनीकरणाचा एक भाग म्हणून मंत्रालयाच्या दर्शनी भागात एशियाटिक लायब्ररीच्या धर्तीवर पायऱ्या बांधण्यात आल्या. वास्तुशास्त्रानुसार प्रवेशद्वार दक्षिण दिशेला नसावे असे सांगण्यात येते त्यामुळे दक्षिण दिशेकडून या पायऱ्यांवरून मंत्रालयात प्रवेश करणे राजकीय पक्षाच्या नेत्यांना सोयीचे नव्हते अशी अंधश्रद्धा होती त्यामुळे या पायऱ्यांची योजना पूर्णत्वास गेली नाही.

अखेर मागील महिन्यात या अशुभ पायऱ्या एका रात्रीत तोडण्यात आल्या. आता या मोकळ्या जागेत तयार करण्यात आलेल्या प्रवेशद्वारातून व्हीव्हीआयपींना म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून इतर सर्व महत्त्वाच्या मंत्र्यांना प्रवेश देण्याची योजना आखली जात आहे. त्यासाठी मोठा मजबूत सागवानी दरवाजा तयार केला आहे. व्हीव्हीआयपी प्रवेशद्वाराला साजेसा लूक देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

आज मंत्रालयात बैठक
मंत्रालयात प्रवेशासाठी नव्याने तयार करण्यात येणारा व्हीव्हीआयपी गेट सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून व्यवहार्य आहे अथवा नाही यावर निर्णय घेण्यासाठी 10जूनला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंत्रालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यानंतरच व्हीव्हीआयपींच्या प्रवेशाचा अंतिम निर्णय होईल. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी हिरवा कंदील दाखवला तरी राजकीय नेत्यांना दक्षिणेकडून मंत्रालयात प्रवेश करणे किती रुचेल याची पोलिसांनाही शाश्वती नाही कारण राजकीय नेत्यांचा वास्तुशास्त्रावर प्रचंड विश्वास असतो. पुढील काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांना मंत्रालयातील दक्षिणस्वारी किती पसंत पडेल याची सरकारी अधिकाऱ्यांना शाश्वती नाही.

आपली प्रतिक्रिया द्या