अग्निशमन दलावरचा मराठी चित्रपट ‘अग्निपंख’

59

सामना ऑनलाईन । मुंबई

‘अग्निपंख’ या चित्रपटाचे टीझर पोस्टर नुकतेच सोशल नेटवर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हॉलिवूडपट वाटावा असं हे पोस्टर मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अग्निशमन दलाववर आधारित बिग बजेट चित्रपटावर काम सुरू असल्याची चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. आता हे पोस्टर पाहून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. ‘विटीदांडू’ या यशस्वी चित्रपटानंतर दिग्दर्शक गणेश कदम त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘अग्निपंख’ हा चित्रपट घेऊन येत आहेत.

महाकाय अग्नितांडव असो…भूकंप असो वा महाप्रलय, माणूसच नव्हे तर प्राणी-पक्ष्यांचे जीव वाचवण्याचं कार्य अग्निशमन दल प्रतिकूल परिस्थितीत करत असतं. ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अग्निशमन दलाचे जवान अहोरात्र सेवा बजावत असतात. अशा कर्तव्यनिष्ठ अग्निशमन दलाचा संघर्ष एका जबरदस्त थरारक घटनेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

“अग्निशमन दलावरचा हा पहिला भारतीय अॅक्शनपट आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट सिनेतंत्रज्ञांचा सहभाग ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. त्यामुळे ‘अग्निपंख’मराठी प्रेक्षकांसाठी व्हीज्युअल ट्रीट असणार आहे”, असा विश्वास दिग्दर्शक गणेश कदम यांनी व्यक्त केला आहे. या चित्रपटातील कलाकार कोण? या प्रश्नाचे उत्तर अजुनही गुलदस्त्यात आहे. ‘अग्निपंख’ची कथा गणेश कदम यांची असून पटकथा सचिन दरेकर यांनी लिहिली आहे. ‘रीतू फिल्म कट’ निर्मित ‘अग्निपंख’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या