शिवसेनाप्रमुखांवरील भव्य चित्रपटाची आज घोषणा, बाळासाहेब यांच्या भूमिकेत कोण?

सामना प्रतिनिधी । मुंबई

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी साद घालीत हिंदुस्थानी जनतेत स्फुल्लिंग चेतविणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा देशाला मिळालेला झंझावाती अष्टाक्षरी महामंत्रच. लाखो-करोडो जनतेने आपल्या हृदयात दैवत म्हणून पुजलेल्या या महान नेत्याच्या जीवनावर भव्यदिव्य हिंदी व मराठी चित्रपट लवकरच देशवासीयांच्या भेटीला येणार आहे. या भव्य चित्रपटाची घोषणा आज गुरुवारी सांताक्रुझ येथील ग्रॅण्ड हयात येथे सायंकाळी ७ वाजता महानायक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित राहणार आहेत.बाळकडूच्या सुपरडुपर हिट यशानंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

चित्रपटाचे लेखनही संजय राऊत यांनीच केले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील दिग्गजांची टीम उतरली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि अमिताभ बच्चन हे एकमेकांचे जीवलग मित्र. राजकारण, समाजकारण, व्यंगचित्रकार, पत्रकार अशा सर्वच क्षेत्रांतील बिग बी अर्थात बाळासाहेबांवरील या बिग बजेट सिनेमाच्या फर्स्ट लुकचे लाँचिंग बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळय़ास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शिवसेनाप्रमुखांची भूमिका कोण साकारणार? देशभरात प्रचंड उत्सुकता

हिंदुहृदयसम्राट हे सिंहासन धारण करीत अवघ्या हिंदुस्थानात वादळ निर्माण करणारे, लेखणी आणि वाणीच्या गर्जनेने मराठी माणसाचा स्वाभिमान चेतविणारे, व्यंगचित्रकार ते जागतिक कीर्तीचे महान नेते असा प्रवास असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या जीवनावरील या चित्रपटात त्यांची भूमिका कोण साकारणार याबद्दल अवघ्या देशभरात प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमाचे नाव काय असेल, दिग्दर्शन कोण करणार, या सगळय़ा प्रश्नांची उत्तरे आज, गुरुवारी रसिकांना मिळणार आहेत.