नव्या दमाची नवी पिढी!

  • नितीन फणसे

विराजस कुलकर्णी आजची नवी पिढी. आज त्याची ओळख मृणाल कुलकर्णीचा मुलगा अशी असली तरीही त्याची मेहनत आणि जिद्द वाखाणण्याजोगी…

आजची पिढी कोणताही निर्णय घेते त्यामागे त्यांचा अभ्यास आणि मतं असतात. किमान मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस याच्याकडे पाहिलं तर हे नक्की पटेल. कारण अभिनेत्रीचा… त्यातही सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा असला म्हणजे सिनेमात प्रवेश अगदी सहज… हे गणित असलं तरी विराजसने सिनेमा तंत्राचा, दिग्दर्शनाचा आणि पटकथा लेखनाचा चांगला अभ्यास करून, त्यात अनुभव घेऊन मोठ्या जिद्दीने चित्रपटक्षेत्रात पाऊल टाकलंय. येत्या शुक्रवारी १२ जानेवारीला त्याची भूमिका असलेला ‘हॉस्टेल डेज’ हा मराठी सिनेमा प्रदर्शित होतोय. सिनेमातला प्रवेश आणि पुढील योजना यावर तो बोलायला लागला तेव्हा नुसतं ऐकत राहावंसं वाटतं.

सिनेमात प्रवेश केल्याबाबत बोलताना तो म्हणाला, आमच्या शाळेत पहिलीपासूनच नाटक हा एक विषय असायचा. त्यामुळे तेव्हापासूनच नाटकांचं बाळकडू मिळालं. स्टेजवर असणं ही उपजत कला असल्यासारखं झालं. पुढे मोठा होत गेलो तसतशी मी मित्रांसोबत ‘थिएटर एन्टरटेन्मेंट’ नावाची नाटकाची संस्था काढली. तेथे आम्ही आम्हाला हवी तशी नाटकं बसवू लागलो. या संस्थेत आम्हीच नाटकं लिहायचो, बसवायचो, अभिनयही करायचो. त्यातच घरी दोन अभिनेते होतेच. माझे आजोबा आणि आई… त्यांची या बाबतीत खूप मदत व्हायची. त्यामुळे माझा कल साधारण या बाजूला होताच. मी ऍडव्हर्टायजिंगमध्ये डिग्री घेतली आहे. शिवाय सुभाष घईंच्या संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएट फिल्म मेकिंगही केलंय. तेथेच पटकथा लेखनात मी मास्टर्स डिग्री घेतली. त्यामुळे चित्रपट लेखन हा माझा हातचा मळ आहे. तेव्हाच आईच्या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं.

विराजसने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलंय. पण तो पटकथा लेखनात तरबेज आहे. त्यामुळे या दोनपैकी नेमक्या कोणत्या क्षेत्रात पुढे जाणार असं विचारता तो म्हणतो, लहानपणी आईने इतर सिनेमे दाखवण्यापेक्षा मला चार्ली चाप्लीनचे सिनेमे दाखवले. हा चार्ली चाप्लीन अभिनेताही होता, दिग्दर्शकही होता आणि इतरही सगळं काही होता. त्यामुळे तेव्हापासून तसंच सगळं करण्याची इच्छा मनात रुजली आहे. ध्येय तेच ठेवलंय की चार्ली चाप्लीनसारखं बनायचंय. अभिनय झाल्यानंतर जेव्हा पहिली पटकथा लिहायची वेळ आली तेव्हा पहिला पगार आईच्या चरणी ठेवतो तसं मी पहिली पटकथा आईच्या सिनेमासाठी लिहिली आहे.

अभिनेत्रीचा मुलगा असलो तरी काहीच वेगळी वागणूक मिळाली नाही असं तो स्पष्ट करतो. सगळे अभिनेते आधीपासून ओळखीचे असल्याने सिनेमा करताना खूप मजा आली, असंही तो स्पष्ट करतो. ‘हॉस्टेल डेज’मध्ये तो खलनायकच वाटू शकेल. पण आपण नायक किंवा खलनायक असं काही मानत नाही. भूमिका मोठी असली पाहिजे आणि सिनेमात ती महत्त्वाची असली पाहिजे असंच त्याचं म्हणणं आहे.

पाया नाटकाचाच…
विराजसने यापूर्वी नाटकाचं दिग्दर्शनही केलं आहे. त्याबाबत बोलताना तो सांगतो, पाचेक वर्षांपूर्वी पुण्यात मी मित्रांसोबत नाटकाची संस्था सुरू केली. तेव्हा आम्ही फक्त चार मित्र होतो. आता ४० ते ५० मुलं आहेत. आतापर्यंत आम्ही १५ नाटकांचे प्रोजेक्ट्स पूर्ण केली आहेत. त्यातली ८ नाटकं सध्या चालू आहेत. यात हिंदी, मराठी, इंग्रजी आणि मूकनाटय समाविष्ट आहेत. तेथे गरज पडेल तसं लिहायला शिकलो, दिग्दर्शन द्यायला शिकलो, असं तो स्पष्ट करतो. यामुळे अभिनयक्षेत्रात पाय रोवायचे असतील तर नाटकांचा पाया असला पाहिजे. तसा विराजसचा तो आहे हे स्पष्टच होतंय.

‘हॉस्टेल डेज’ हा प्रेमाचा त्रिकोण
‘हॉस्टेल डेज’ या सिनेमाबद्दल तो खूप उत्साहात आहे. याबाबत तो सांगतो, हा नव्वदीच्या दशकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला सिनेमा आहे. साताऱ्याच्या बॉईज हॉस्टेलमध्ये ही कथा घडते. तेथे सातारा आणि आसपासची मुले शिकण्यासाठी राहात असतात. त्यामुळे लोकल साताऱ्यातील मुलांचा एक ग्रुप तयार होतो आणि दुसरा ग्रुप बाहेरून आलेल्या श्रीमंत मुलांचा तयार होतो. साताऱ्याच्या मुलांच्या गटांचा म्होरक्या असतो शिवराज मोहिते (आरोह वेलणकर) आणि दुसऱ्या श्रीमंत मुलांच्या गटाचा म्होरक्या जय धर्माधिकारी मी साकारतोय. आमच्या दोघांमध्ये खुन्नस सुरू होते. आमच्यात तेढ वाढते ती प्रार्थना बेहेरेमुळे… त्याचं जिच्यावर प्रेम असतं ती माझी लहानपणापासूनची मैत्रीण असते. त्यामुळे हा प्रेमाचा त्रिकोण होतो. पुढे काय गंमत होते ते पडद्यावर पाहायला मजा येईल.