आर्थर रोड तुरुंगात उभारली अद्ययावत व्यायामशाळा

36

सामना ऑनलाईन । मुंबई

अनेक कुख्यात गुंडाना स्वत:त सामावून घेणाऱ्या आर्थर रोड तुरुंगात कैद्यांसाठी अद्ययावत व्यायामशाळा सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील हे पहिले असे तुरुंग आहे जेथे कैद्यांसाठी व्यायामशाळेची सोय करण्यात आली आहे. ही व्यायामशाळा जरी अद्ययावत असली तरी बाहेरील व्यायामशाळांपेक्षा काहीशी वेगळी असणार आहे. या व्यायमशाळेत डंबबेल्स ठेवण्यात आलेले नसून त्याऐवजी तुरुंग प्रशासनाने एक अनोखी शक्कल लढवली आहे. डंबबेल्सच्याऐवजी व्यायामशाळेत मिठाने भरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या ठेवण्यात येणार आहेत.

येत्या आठवड्यात ही व्यायामशाळा सुरू करण्यात येणार असून या व्यायामशाळेत एकावेळी २५ कैदी या एकत्र व्यायाम करू शकणार आहेत. प्रत्येक कैद्याला व्यायामासाठी ४५ मिनिटे देण्यात येणार आहेत. या व्यायामशाळेत कैद्यांना व्यायाम शिकवायला दोन प्रशिक्षक देखील असणार आहेत. या व्यायामशाळेतील कोणतेही सामान कैद्यांनी व्यायामशाळेबाहेर नेऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली असून प्रत्येक साहित्य हे विशिष्ट मशिनलाअडकवून ठेवण्यात येणार आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून या तुरुंगातील कैदी व्यायामशाळेची मागणी करत आहेत. तुरूंगातील शारीरिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी तुरुंगात व्यायामशाळा हवी अशी मागणी कैद्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळेच ही जिम उभारण्यात आल्याचे तुरुंग अधीक्षक हर्षद अहिरराव यांनी सांगितले.

डंबबेल्स ऐवजी देणार मिठाने भरलेल्या बाटल्या
तुरुंगात कैद्यासाठी अद्यायावत व्यायामशाळा उभारण्यात आली असली तरी यात डंबबेल्स देण्यात आलेले नाहीत. डंबबेल्सचा वापर करून कैदी एकमेकांवर हल्ले करू शकतात त्यामुळे या व्यायामशाळेत डंबबेल्स ठेवण्यात आलेले नाहीत. काही वर्षांपूर्वी कैद्यांना डंबबेल्सऐवजी सिमेंटच्या विटा देण्यात आल्या होत्या मात्र त्या विटांनी काही कैद्यांना एकमेकांवर हल्ले केले होते.

आर्थररोड तुरुंगात सध्या तिप्पट कैदी
१९२५ साली उभारलेल्या आर्थर रोड तुरूंगात सध्या तुरंगाच्य़ा क्षमतेपेक्षा तिप्पट कैदी भरलेले आहेत. या तुरुंगात फक्त ८०४ कैद्यांना ठेवले जाऊ शकते मात्र सध्या इथे तब्बल २८०० कैदी शिक्षा भोगत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या