नोकरीसाठी ‘त्या’ने रस्त्यात वाटले रिझ्यूमे, मिळाली २०० कंपन्यांची ऑफर

48

सामना ऑनलाईन । कॅलिफोर्निया

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी मिळत नसल्याने निराश झालेल्या एका तरुणाने नोकरी मिळवण्यासाठी अनोखा मार्ग शोधला. या अनोख्या पद्धतीमुळे त्याला गुगलसह २०० कंपन्यांनी नोकरीची ऑफर दिली. त्यामुळे नोकरीसाठी वणवण भटकणाऱ्या तरुणाचे जीवन एका कल्पनेने बदलून गेले आहे.

अनेकदा प्रयत्न करूनही सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी मिळत नसल्याने डेव्हिड कैसारेज हा तरुण निराश झाला होता. मात्र, रिकाम्या हाताने घरी परतायचे नाही असे त्याने ठरवले होते. नोकरीसाठी मुलाखतीला जाण्यासाठी, नोकरी शोधण्यासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते. त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीच्या परिसरातील रस्त्यावर उभे राहून त्याने स्वतःचा रिझ्यूमे वाटायला सुरुवात केली. लोकांनी भिकारी समजून पैसे देऊ नये, यासाठी त्याने स्वतःजवळ एक फलक ठेवला होता. त्यावर लिहिले होते ‘मी बेघर आहे. मात्र, यशस्वी होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती माझ्यात आहे. मला मदत करण्यासाठी कृपया एक रिझ्यूमे घ्या आणि नोकरीची माहिती द्या.’ एका महिलेने रिझ्यूमेसह डेव्हिडचे फोटो ट्विटरवर शेअर केले. ते व्हायरल झाल्यानंतर गूगल,नेटफ्लिक्स,लिंक्डइनसह सुमारे २०० कंपन्यांनी डेव्हिडला नोकरीची ऑफर दिली.

डेव्हिडने टेक्सास विद्यापीठातून मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी जनरल मोटर्समध्ये काम केले आहे. मात्र, त्यांना नोकरीतून काढण्यात आले होते. त्यानंतर नोकरीच्या शोधात ते खूप फिरले. अखेर पैसे संपल्याने सिलिकॉन व्हॅलीतील रस्त्यावर रिझ्यूमे वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रिझ्यूमे वाटणाऱ्या डेव्हिडला जैसमीन स्कॉफील्ड नावाच्या महिलेने पाहिले. डेव्हिडला मदत करण्यासाठी तिने रिझ्यूमेसह त्याचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला. त्यानंतर सोशल मिडियावर नेटकऱ्यांनी ‘गेट डेव्हिड अ जॉब’ नावाचा हॅशटॅग चालवला. डेव्हिडला नोकरी देण्यासाठी अनेकांनी जैसमीनलाही फोन केले. मात्र, डेव्हिडकडे आता नोकरीच्या भरपूर ऑफर आहेत. कोणती नोकरी स्वीकारायची याचा निर्णय तोच घेईल, असे जैसमीनने ऑफर देणाऱ्या कंपनीला कळवले.

आपली प्रतिक्रिया द्या