कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) पोर्टलवर येणाऱ्या समस्यांचे निराकारण करण्यासाठी नवी आयटी सिस्टम 2.01 आणली जाणार आहे. ईपीएफओ पोर्टल आणि अॅपशी संबंधित प्रत्येक समस्या तीन महिन्यांत सोडवली जावी, या केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या निर्देशानुसार या सिस्टमची अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या सिस्टममुळे पोर्टलवर लॉगिन करणे, क्लेम आणि त्याचा निपटारा प्रक्रिया एकदम सोपी होईल. तसेच कर्मचाऱ्याची नोकरी बदलली तरी आयडी (एमआयडी) ट्रान्सफर करण्याची गरज राहणार नाही. सध्या ईपीएफओ पोर्टलचा वापर करताना युजर्सना अनेक समस्या येत असून तक्रारी येत आहेत. पोर्टलवर लॉगिन करताना अडचणी येत आहेत. लॉगिन झाले की केवायसी अपडेट करायला सांगत आहेत. केवायसी अपडेट असले तरी पुन्हा करायला सांगितले जात आहेत. सर्व्हर स्पीड स्लो असल्याच्या तक्रारी जास्त आहेत.
तीन महिन्यांत मिळणार दिलासा
ईपीएफओ पोर्टलला जोडल्या जाणाऱ्या सदस्यांची संख्या सतत वाढत आहे. सध्या ज्या आयटी सिस्टमवर पोर्टल काम करत आहे त्याची क्षमता मर्यादित आहे. त्यामुळे सर्व्हर स्लो होत आहे. ईपीएफओ पोर्टलबद्दल अशा तक्रारी वाढल्यानंतर काही दिवसांपूर्वी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मंडाविया यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली. या बैठकीत नव्या आयटी सिस्टम कधी कार्यान्वित होईल यावर चर्चा झाली. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
n पीएफचे दावे किंवा रक्कम काढणे ही प्रक्रिया ऑटो प्रोसेसिंग मोडवर होईल.
n पेन्शनरला एका ठरावीक तारखेला पेंशन द्यावी लागेल.
n युनिवर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) आधारित पेन्शन बॅलन्स बघणे, पासबुक डाऊनलोड करणे ही प्रक्रिया सोपी होईल.
n नोकरी बदलली तरी त्याला जुना आयडी बदलावा लागणार नाही. आधीच्या यूएएन नंबरवरील रक्कम आपोआप नव्या नंबरवर ट्रान्सफर होईल.