कशी आहे संघाची नवी कार्यकारिणी, वाचा सविस्तर

285

सामना ऑनलाईन । नागपूर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा नागपुरात पार पडली. या प्रतिनिधी सभेत पुढील तीन वर्षांकरिता सरकार्यवाह या पदावर सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांची निवड करण्यात आली. तर रविवारी नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. संघात आता सहा सह सरकार्यवाह राहणार असून आजवर प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या डॉ. मनमोहन वैद्य यांनाही त्यात स्थान देण्यात आले आहे. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. उपाख्य बाबुराव वैद्य यांचे ते ज्येष्ठ पुत्र आहेत.

रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरात ९ ते ११ मार्च दरम्यान अखिल भारतीय प्रतिनिधी सभा पार पडली़ या सभेत संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भातही मंथन करण्यात आले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह संघ परिवारातील ३५ संघटनांचे १,४०० प्रतिनिधी सहभागी झाले होते.

विविध संघटनांच्या प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पुढील तीन वर्षासाठीची कार्यकारिणीही प्रतिनिधी सभेच्या शेवटच्या दिवशी गठित करण्यात आली. सलग चौथ्यांदा सरकार्यवाहपदावर नियुक्त झालेल्या भय्याजी जोशी यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या अखेरच्या दिवशी ही निवड केली. संघात आता ४ ऐवजी ६ सहकार्यवाह झाले असून डॉ. मनमोहन वैद्य व मुकुंद सी.आर. यांचा त्यात समावेश आहे. या कार्यकारिणीमध्ये काही नवीन चेहरे समाविष्ट करण्यात आले असून काही पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत.

प्रत्येक प्रांतातील स्वयंसेवकांना या कार्यकारिणीत संधी देण्याचा प्रयत्न झाला आहे. मूळचे नागपूर येथील डॉ.मनमोहन वैद्य यांच्याकडे अखिल भारतीय प्रचार प्रमुख ही जबाबदारी होती. तर मूळचे कर्नाटक येथील मुकुंद सी.आर. यांच्याकडे अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख ही जबाबदारी होती. त्यांच्याकडे आता सहसरकार्यवाहपदाची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, मुकुंद यांच्या रिक्त झालेल्या अखिल भारतीय सह बौद्धीक प्रमुख या पदावर सुनीलभाई मेहता यांची तर मनमोहन वैद्य यांच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुख पदावर अरूण कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरूण कुमार यांच्याकडे आता प्रसारमाध्यमांशी संपर्क ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

अशी आहे कार्यकारिणी
सरसंघचालक – डॉ. मोहन भागवत,
सरकार्यवाह – भय्याजी जोशी
सहसरकार्यवाह – सुरेश सोनी, दत्तात्रय होसबळे, डॉ कृष्णगोपाल, व्ही भागय्या, मनमोहन वैद्य, मुकुंद सी. आर.
शारीरिक प्रमुख – सुनिल कुळकर्णी, सहशारीरिक प्रमुख – जगदीश प्रसाद,
बौद्धिक प्रमुख – स्वान्तरंजन, सहबौद्धिक प्रमुख – सुनिलभाई मेहता,
सेवाप्रमुख – सुहास हिरेमठ, सहसेवा प्रमुख – अजित महापात्रा, गुणवंत कोठारी,
व्यवस्था प्रमुख – मंगेश भेंडे, साकलचंद बागरेचा, सहव्यवस्था प्रमुख -अनिल ओक,
प्रचार प्रमुख – अरुण कुमार, सहप्रचार प्रमुख – नरेंद्र ठाकूर,
संपर्क प्रमुख – अनिरूद्ध देशपांडे, हस्तिमल, सहसंपर्क प्रमुख – सुनील देशपांडे, रमेश पप्पा,
पश्चिम क्षेत्र बौद्धिक प्रमुख – अनिल जोशी,
पश्चिम महाराष्ट्र प्रचारक – यशोवर्धन वाळिंबे,
राजकीय क्षेत्र – विजय पुराणिक

आपली प्रतिक्रिया द्या