ग्रामीण भागातील बालरुग्णांना नवे जीवन

27

>> राजेश पोवळे

मोलमजुरी करून पोट भरणाऱ्या गावातील गरीब, गरजू रुग्णांना किरकोळ उपचार करणेही जिकिरीचे असते. त्यात गंभीर व्याधी असेल तर आर्थिक अडचणींमुळे त्याकडे दुर्लक्षच करावे लागते. बालपणातच या व्याधींवर उपचार केले नाहीत तर मोठेपणी त्या बळावतात आणि मग अवघे आयुष्य पणाला लागते. गरिबीमुळे मुंबईपर्यंत पोहचू न शकणाऱ्या अशा व्याधीग्रस्त बालरुग्णांवर गावात जाऊन विनामूल्य शस्त्रक्रिया करीत व्याधीमुक्त करणारे डॉ. संजय ओक त्यांच्यासाठी देवदूतच ठरले आहेत. शहापूर, अलिबाग आणि चिपळूणमधील जवळपास एक हजारहून अधिक बालरुग्णांना
डॉ. ओक यांनी नवे जीवन दिले आहे. त्यांच्याशी साधलेला संवाद…

सेवानिवृत्तीनंतर खासगी रुग्णालयात मोठा हुद्दा आणि चांगला पगार मिळत असतानाही ग्रामीण भागात रुग्णसेवेसाठी धावाधाव करण्यामागे नेमके कारण काय?

सहा वर्षांपूर्वी चिपळूण-डेरवण येथील पंत वालावलकर रुग्णालयात गेलो असताना मला स्वतःलाच एक सत्य उलगडलं. २६ वर्षे केईएम, नायरमध्ये काम करताना आपण फार मोठे काम करतोय, गरीबांसाठी झटतोय असं वाटत होतं; पण स्वेच्छानिवृत्तीनंतर जेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरायला लागलो तेव्हा असं लक्षात आलं की, खूप मोठा वर्ग आहे जो मुंबईपर्यंत पोहचू शकत नाही आणि उपचाराअभावी त्यांची आयुष्यं उद्ध्वस्त होतात. मग निर्णय घेतला, थेट गावात रुग्णांपर्यंत जाऊन त्यांना विनामूल्य सेवा द्यायची. लहान मुलांच्या शरीरावरील लहान-मोठय़ा गाठी, टंग टाय, बोट चिकटणे, जादा बोट काढणे, टेस्टीज, हर्निया, अनडिसेंड टेस्टीज, हायड्रोसील अशा शस्त्र क्रियांसाठी महिन्याचा एक रविवार शहापूरचे ग्रामीण रुग्णालय, एक रविवार अलिबाग सिव्हिल रुग्णालय आणि एक रविवार डेरवण रुग्णालयात जातो आणि प्रत्येक महिन्याला किमान ३५ मुलांवर त्यांच्या गावातच संपूर्ण विनामूल्य शस्त्रक्रिया करतो.

ग्रामीण भागातील रुग्णांच्या ‘मेडिकल टुरिझम’ची ही योजना कशी शक्य केलीत?

अरबस्तान आणि आखाती देशातील अनेक रुग्ण आपल्या देशात उपचार करण्यासाठी येतात. त्यासाठी लाखो, करोडो रुपये खर्च करतात. हा मेडिकल टुरिझमचा जमाना आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला उपचारासाठी मुंबईत येणं हे त्यांच्यासाठी मेडिकल टुरिझमच आहे. ऑपरेशन, उपचाराचा मोठा खर्च, रुग्णासोबत नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था, त्यांच्या खाण्यापिण्याचा खर्च हे त्यांना परवडणारं नसतं. मग हे दुखणं अंगावर काढत ते जगतात. अशा रुग्णांची त्यांच्या गावात जाऊन सेवा करायची आहे अशी विनंती सरकारला केली. त्याला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तत्काळ प्रतिसाद दिला. त्यांनी थेट आदेशच काढला आणि त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन मुलांवर तिथेच शस्त्रक्रिया करणे शक्य झाले.

स्थानिक सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो?

शहापूर, अलिबाग आणि डेरवण रुग्णालयातील कर्मचाऱयांचा या उपक्रमात सिंहाचा वाटा आहे. रविवार असूनही सुट्टीचा विचार न करता तेथील कर्मचारी कोणतीही कुरकुर न करता आनंदाने या सेवाकार्यात सहभागी होतात. यासाठी खूप पूर्वतयारी करतात. घरोघरी जाऊन रुग्ण शोधतात, त्यांना रुग्णालयापर्यंत आणतात, त्यांची यादी तयार करतात, त्यांची पूर्वतपासणी करतात. मी तिथल्या रुग्णालयात जाण्याआधी दोन दिवस वॉट्सऍपवर मला रुग्णांची यादी येते. कोणते रुग्ण आहेत, त्यांना काय करण्याची गरज आहे याची माहिती मला दिली जाते. गेल्या गेल्या रुग्णतपासणी करून शस्त्रक्रिया करणे सोपे होते. रुग्णांच्या नातेवाईकांशीही मोबाईलवरून संपर्क ठेवून त्याच्या प्रकृतीची हालहवाल कळते.

यासाठी वेगळी टीम बनविली आहे का?

माझ्यासोबत वाडिया रुग्णालयात काम करणारे डॉ. सुयोधन रेड्डी, ऍनेस्थेटिस्ट जयश्री कोरे अशी सामाजिक काम करणारी टीम आहे. ही टीम आमची शक्ती आहे. सरकार आमच्या उपक्रमासाठी अल्पस्वल्प मानधन देते, पण मानधन हा आमचा उद्देश नाही. या लहान मुलांवर तातडीने शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या आयुष्याला उभारी देणे हेच आमचे मिशन आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांच्या काय भावना असतात?

या मुलांच्या थेट घरापर्यंत जाऊन उपचार आणि शस्त्रक्रिया होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद शब्दात मोजता येणार नाही. या रुग्णांच्या फॉलोअपसाठी जेव्हा जातो तेव्हा त्यांचे आई-वडील हळूच एक पिशवी माझ्या हातात देतात. त्या पिशवीत कधी भाजी असते, कधी पोहे असतात, कधी अर्धा किलो तांदूळ असतात. आमच्याकडे पैसे नाहीत, पण ही आमची भेट घ्याच हा त्यांचा हट्ट असतो. सुदाम्याचे हे पोहे मला मोठय़ा पारितोषिकापेक्षाही मोलाचे आहेत.

ज्यांच्यावर गावात शस्त्रक्रिया करणे शक्य नाही त्यांचे काय?

ज्या मुलांचे आजार बळावले आहेत किंवा त्यांच्यावर ग्रामीण भागात उपचार किंवा शस्त्रक्रिया होणे शक्य नाही अशा मुलांची वेगळी यादी तयार करतो. त्यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सरकारी व इतर कागदपत्रांची पूर्तता करून घेतो आणि त्यांना मुंबईत आणून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात संपूर्ण विनामूल्य शस्त्रक्रिया करतो.

सरकारी योजनांचा फायदा होतो काय?

होय, नक्कीच! या महागडया शस्त्रक्रिया आणि त्यावरील औषधोपचार संपूर्ण विनामूल्य व्हावेत यासाठी तीन योजनांचा मी आधार घेतो. त्यासाठी पूर्वीची राजीव गांधी आणि आता महात्मा फुले नावाने ओळखली जाणारी जन आरोग्य योजना. खासगी रुग्णालयांच्या उत्पन्नातून गरीब रुग्णांसाठी खर्च केली जाणारी दोन टक्के रक्कम आणि तिसरी म्हणजे सरकारची गरीब रुग्ण सहाय्यता निधी योजना. गरीब रुग्ण सहाय्यता निधी समितीवर सरकारने माझी सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. वेगवेगळय़ा आजारांना या मुख्यमंत्री योजनेतून मदत दिली जाते. दर आठवडयाला त्याची बैठक होते आणि रुग्णांनी अर्ज केल्यापासून सात दिवसांत त्यांना मदत दिली जाते. या योजनांचा पुरेपूर वापर मी ग्रामीण भागातील मुलांच्या शस्त्रक्रिया आणि उपचारासाठी करतो.

या प्रवासासाठी आणि सेवाकार्यासाठी वेळेचे नियोजन कसे करता?

बाबा आमटे, अभय बंग यांच्यासारखे समाजसुधारक गडचिरोलीसारख्या भागात जाऊन काम करतात. कदाचित ते मला शक्य होणार नाही. मग मी काय करू शकतो याचा विचार केला आणि हा मध्यम मार्ग काढला. त्यासाठी स्वतःवर काही बंधने घातली. रविवारचे कार्यक्रम, समारंभ रद्द केले. पूर्वी खूप भाषणे करत फिरायचो. मग बोलणं बंद केलं. सदरे लिहिण्याला स्वल्पविराम दिला. वेळ काढला आणि तो माझ्या ग्रामीण भागातील मुलांसाठी दिला. पण हे मी करत नाही, तर परमेश्वरच माझ्याकडून हे करवून घेतो आहे.

आपली प्रतिक्रिया द्या