कष्टकरी हातांना मिळणार कायमची बाजारपेठ

68

ठाणे – अन्नपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, फॅब्रिक, ज्वेलरी… अशा अनेक कामांमध्ये गुंतलेले महिलांचे हात बचत गटाच्या निमित्ताने एकत्र आले असले तरी त्यांना हक्काची बाजारपेठ अद्याप मिळाली नव्हती. हिरकणी महिला उत्कर्ष मंडळाच्यावतीने या बचत गटांना आता वर्षभराची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे मेहनतीचे काम करणाऱ्या या हातांना आणखी बळ मिळणार १२ हजार बचत गटांची नोंदणी झाली आहे. तसेच हा देशातला पहिलाच उपक्रम असल्याचा दावा हिरकणीच्या वतीने करण्यात आला आहे.

बचत गटाच्या माध्यमातून असंख्य महिला जीवनावश्यक वस्तू तयार करून आपल्या संसाराचा रहाटगाडा चालवत आहेत. विविध प्रदर्शनातून, मेळाव्यातून ते आपले काम ग्राहकांपर्यंत पोहचवत असल्यातरीही अद्याप त्यांना हवी तशी कायमस्वरूपी बाजारपेठ मिळाली नव्हती. हिरकणी संस्थेच्या वतीने २९ जानेवारीपासून ठाण्यातील चंदनवाडी परिसरात बचतगटांना कायमस्वरूपी बाजार पेठ मिळणार आहे. देशातील हा पहिला उपक्रम असून यामध्ये विविध बचतगटांना फर्स्ट कम फर्स्ट बेसीसवर येथे सहभागी होता येणार आहे. रोटेशन पद्धतीने सुरू होणाऱ्या बाजारपेठेत सुमारे १२ हजार बचत गट तसेच छोटे उद्योजक सहभागी होणार आहेत. आतापर्यंत २७८ वस्तू आणि पदार्थ विक्रेत्यांचे नियोजन या ठिकाणी झालेले आहे. लहानबाळांचे कपडे, लोणचे आणि बरंच काही या बाजारात मिळाणार आहे.

कर्जाचे पाठबळ

या ठिकाणी संगठीत होणाऱ्या बचतगटांना मार्गदर्शन करण्यासाठी हिरकणी बचतगट मार्गदर्शन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शिवाय विविध उत्पादनांच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे वित्त सहाय्य ग्रेटर बँकेच्या सहकार्याने करण्यात येणार आहे. महिलांसाठी वैयक्तीक पातळीवर विविध कर्ज योजना राबवणार असल्याचे हिरकणी संस्थेच्या अध्यक्षा विद्या भांडे यांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या