सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या, पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल

1372

चारित्र्यावर संशय घेऊन सतत होणाऱ्या सासरच्या छळास कंटाळून नवविवाहितेने आत्महत्या केल्याची घटना उदगीर तालुक्यातील हंगरगा (कु.) येथे घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून सासरच्या पाचजणांविरुध्द उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीचे वडील गोविंद गोपीनाथ जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, त्यांची मुलगी मेहंदी हिचे लग्न गावातील प्रशांत विनायक अंधारे याच्यासोबत 16 एप्रिल 2020 रोजी करून दिले होते. लग्नामध्ये सोने, संसारोयोगी वस्तु असा सुमारे 8 लाख रुपये खर्च केला होता. लग्नानंतर केवळ 15 दिवस मुलीस चांगले नांदवले. जावई प्रशांत हा लडाख (जम्मू-कश्मीर) येथे सैन्य दलात नोकरीस गेल्यानंतर सासू सुनंदा अंधारे, सासरा विनायक अंधारे, दिर कृष्णा अंधारे, नणंद रुपाली सोनकांबळे हे तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार शिवीगाळ करून मारहाण करीत होते. मुलीने ही घटना अनेकवेळा वडिलांना सांगितली.

जावई आल्यानंतर आपण त्यांच्याशी बोलू अशी मुलीची समजूत ते काढत होते. 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता मुलीची नणंद रुपाली सोनकांबळे हिने फोनवरुन सांगितले की, मुलीची तब्येत बरी नाही, तुम्ही लवकर या. त्यानंतर फिर्यादी हे मुलीच्या सासरी गेले असता मुलीने सतत होणाऱ्या छळास कंटाळून विष घेतल्याचे सांगितले. तिला तातडीने उपचारासाठी उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी विनायक अंधारे, सुनंदा अंधारे, कृष्णा अंधारे, रुपाली सोनकांबळे, प्रशांत अंधारे आदीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या