नवी मुंबई विमानतळाला डिसेंबर 2024 चा मुहूर्त

नवी मुंबई येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी सुरू होणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अखेर विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱया अदानी समूहाने याबाबत माहिती दिली आहे. नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पुढच्या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरित टप्प्यांचा विकास हा आगामी 15 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने केला जाईल, अशी माहिती अदानी होल्डिंग लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी दिली. वार्षिक 2 कोटी प्रवासी आणि 0.8 दशलक्ष टन माल हाताळण्याची क्षमता नवी मुंबई विमानतळाच्या पहिल्या टप्प्याची असल्याचेही ते म्हणाले.

अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा खासगी विमानतळ ऑपरेटर आहे. अदानी समूहाकडे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह 7 विमानतळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. अदानी समूहाकडून नवी मुंबई विमानतळाचे काम सुरू आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे 9 कोटी प्रवासी आणि 2.5  दशलक्ष मेट्रिक टन माल हाताळण्याएवढी वार्षिक क्षमता नवी मुंबई विमानतळाची असणार आहे, अशी माहिती बन्सल यांनी दिली.