नवनियुक्त महापालिका आयुक्त गमेंची ग्वाही: सर्वांना बरोबर घेवून कामकाज करणार

सामना प्रतिनिधी । नाशिक

सर्वांना बरोबर घेवून जनहिताच्या दृष्टीने शहर विकासाची कामे केली जातील, अशी ग्वाही महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर पदभार स्वीकारल्यानंतर गमे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौदा दिवसांपूर्वी मंत्रालयात नियोजन विभागाचे उपसचिव म्हणून तडकाफडकी बदली करण्यात आली. मुंढेंच्या हुकुमशाही कारभारामुळे कामकाज ठप्प होवून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी विरूद्ध मुंढे असा वाद रंगला होता. बेसूमार करवाढ करून नाशिककरांनाही वेठीस धरले होते. अनेक विषय वादग्रस्त ठरले होते. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही न जुमानल्याने अखेर मुंढेंची बदली करण्यात आली.

चौदा दिवसांनंतर राधाकृष्ण गमे यांची नाशिक महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. गुरुवारी सकाळी अकरा वाजता त्यांनी आपला पदभार स्वीकारला. मुंढे यांच्या कार्यकाळातील योग्य व जनहिताचे निर्णय तसेच राहतील. यापूर्वी नाशिकमध्ये काम केल्याने येथील अनुभव चांगला आहे. प्रशासन व पदाधिकारी यांच्यात समन्वय साधला जाईल. शहरवासीयांसह लोकप्रतिनिधींना बरोबर घेवून विकासकामे केली जातील. स्मार्ट सिटीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल, असे गमे यांनी पत्रकारांना सांगितले. खातेप्रमुखांची बैठक घेवून कामकाजाची माहिती घेवून सूचना दिल्या.