‘तुम बिन’मधून अनुभवता येणार कुमार सानूंच्या आवाजाची जादू

65

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकात आपल्या स्वरांनी तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले गायक म्हणजे कुमार सानू. त्यांच्या आवाजाची मोहिनी दीड दशकांनंतरही श्रोत्यांच्या मनावर कायम आहे. हीच जादू घेऊन कुमार सानू तुम बिन या अल्बमद्वारे पुन्हा श्रोत्यांच्या भेटीला आले आहेत. प्रख्यात गायक कुमार सानू आणि आघाडीच्या गायिका मधुमिता चॅटर्जी यांनी एकत्रितपणे ‘तुम बिन’ हा नवीन अल्बम बनवला आहे. या अल्बमचे प्रकाशन प्रख्यात गायक सुरेश वाडकर आणि अनुप जलोटा यांच्या हस्ते झाले. मुंबईत आयोजित एका विशेष कार्यक्रमात हा प्रकाशन समारंभ पार पडला तेव्हा संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कुमार सानू आणि त्यांचे कुटुंबीय नुकतेच अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये राहायला गेले होते. समीर आणि मधुमिता हे त्यांना तेथेच भेटले. सानू यांच्या ज्येष्ठ कन्या या भारतीय संगीताचे धडे मधुमिता यांच्याकडून घेतात. मधुमिता यांच्या गझल ऐकल्यावर सानू यांनी एका नवीन अल्बमवर काम करण्याचे ठरवले. लॉस एंजलीसचे प्रख्यात बोरा काराकास आणि कोलकाता येथील व्हायब्रेशन स्टुडीओचे गौतम बासू या दोघांनी या अल्बमचे ध्वनिमुद्रण केले आहे. या अल्बमच्या संगीताचे मिक्सिंग आणि संकलन ‘स्टुडीओ २०८’च्या अलोक पुंजनानी यांनी केले आहे.

या अल्बममधील संजय (बापी) दास यांच्या रचना आहेत.यातील अनोख्या अशा पाच ट्रॅकची संगीत रचना लॉस एंजलीस येथील समीर चॅटर्जी यांची आहे. इतर दोन ट्रॅक हे राजीब चक्रवर्ती आणि सुवोदीप मुखर्जी यांचे आहेत.कुमार सानू म्हणाले, “मला खूप आनंद होत आहे की, १९९०च्या दशकातील मधुर संगीताची आम्ही पुनरुक्ती करत आहोत. उत्तम गीते आणि संगीत ‘तुम बिन’च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत. हा अल्बम लोकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या