१०५ वर्षांच्या आजोबांनी सायकलिंगमध्ये रचला नवा विश्वविक्रम

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

१०० पूर्ण केलेल्या एका आजोबांनी सायकलिंगमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केलाय. रॉबर्ट मर्चंड या १०५ वर्षांच्या गृहस्थाने २२.५ किलोमीटरचं अंतर १ तासात पूर्ण केलं. शंभरी ओलांडलेल्या व्यक्तीने हे २२.५ किलोमीटरचं अंतर वेगात पूर्ण केल्याचा रेकॉर्ड त्यांनी आपल्या नावे केला आहे.

रॉबर्ट हे फ्रांसमध्ये अत्यंत प्रसिद्ध सायकलपटू आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येनं फ्रेंच नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करून उभे होते. त्यांनी १४ व्या वर्षी सायकल चालवायला सुरूवात केली, मात्र सायकलिंगकडे ते ६७ व्या वर्षी वळले. त्यांनी ६७ व्या वर्षापासून सायकलिंगवर प्रचंड मेहनत घ्यायला सुरूवात केली.

१९११ साली रॉबर्ट यांचा जन्म झालाय. शंभरी पूर्ण केल्यानंतर रॉबर्ट यांनी १०० किलोमीटरचं अंतर ४ तास १७ मिनिटं आणि २७ सेकंदात पूर्ण करण्याचा पराक्रम केला होता. जो देखील एक विक्रम आहे, त्यापाठोपाठ शंभरी पूर्ण केलेल्या व्यक्तीने २२.५ किलोमीटरचं अंतर १ तासात पूर्ण केल्याचा विक्रम त्यांनी आपल्या नावे केला आहे.

या विक्रमानंतर बोलताना रॉबर्ट यांनी सांगितलं की शेवटची १० मिनिटं उरली आहेत याची माहिती देणारा फलक मी बघितला नाही, तो बघितला असता तर मी वेग अजून वाढवला असता आणि आणखी कमी वेळात हे अंतर पार करून दाखवलं असतं.