पोलिसांना मिळणार आवडीनुसार बदली

सामना ऑनलाईन,मुंबई

पोलीस कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या इच्छेनुसार पाहिजे त्या आयुक्तालय अथवा जिल्हा पोलीस दलात बदली करून घेता येणार आहे. राज्य सरकारने पोलीस कर्मचाऱ्यांच्या घटक बदलीस मान्यता दिली आहे. फक्त आपल्या आवडीनुसार बदली करून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना काही नियम व अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानंतर बदलीचा मार्ग मोकळा होणार आहे.

राज्यातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडीनुसार घटक बदली घेण्यास राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाला आहे. बदली घेण्यास परवानगी मिळाली असली तरी संपूर्ण सेवाकाळात फक्त दोन वेळाच अन्य ठिकाणी बदली घेता येणार आहे. शिवाय काही नियम व अटी टाकण्यात आल्या असून त्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. दरम्यान, राज्य राखीव पोलीस बल गटातील कर्मचाऱ्यांना मात्र आवडत्या ठिकाणी बदली घेता येणार नाही. त्यांना घटक बदलीच्या नियमातून वगळण्यात आले आहे.

काही अपवादात्मक परिस्थितीत सध्या काम करीत असलेल्या मूळ ठिकाणी किमान ३ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या संबंधितांची विनंती विचारात घेता येणार आहे. n पती किंवा पत्नी शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असल्यास. n कर्मचारी स्वतः किंवा त्याची पत्नी, आई, वडील तसेच मुलाला गंभीर आजार असल्यास. n नक्षलवादी किंवा अतिरेकी हल्ल्यातील पीडित कुटुंबातील असायला हवा.

या अटी पूर्ण केल्यास बदलीस पात्र

  • बदलीसाठी इच्छुक असलेल्या कर्मचाऱयाची नियुक्ती नियमित असावी व स्थायित्व प्रमाणपत्र दिलेले असावे.
  • कर्मचाऱयाची तो आहे त्या आयुक्तालयात किंवा जिल्हा पोलीस दलात किमान आठ वर्षे सेवा पूर्ण झालेली असावी.
  • एकदा बदली झाल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी बदली हवी असल्यास ती मिळेल. परंतु बदलीच्या ठिकाणी किमान दोन वर्षे सेवा पूर्ण करणे बंधनकारक राहील.
  • कर्मचाऱ्यांला संपूर्ण सेवाकाळात केवळ दोन वेळा बदली करून घेता येईल.

 

एक महिन्यात निर्णय

यापूर्वीही पोलीस कर्मचारी अन्य ठिकाणी बदलीसाठी अर्ज करीत होते, मात्र त्या अर्जावर तातडीने निर्णय घेतला जात नव्हता. पण आता तसे होणार नाही. सर्व आयुक्त किंवा जिल्हा अधीक्षकास सर्व विनंती अर्जांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेणे बंधनकारक राहणार आहे. अशी प्रकरणे विनाकारण प्रलंबित राहणार नाहीत याची संबंधित अधिकाऱ्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे.