दिल दोस्ती दुनियादारी ‘दोबारा’

सामना ऑनलाईन, मुंबई

दिल दोस्ती दुनियादारी ही मालिका झी मराठीवर प्रचंड गाजली होती. या मालिकेचा पहिला सीझन संपल्यानंतर पुढचा सीझन केव्हा येणार याची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता होती. ही प्रतिक्षा संपली असून ही मालिका दिल दोस्ती दोबारा या शीर्षकाखाली १८ फेब्रुवारीपासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्री १०.३० वाजता या मालिकेचं प्रसारण होणार आहे.

‘दिल दोस्ती दोबारा’ मालिकेची नवी गोष्ट माजघरात नाही उपहारगृहात प्रवेश करणार आहे. ‘खयाली पुलाव रेस्टॉरंट’ असं या उपहारगृहाचं नाव ठेवण्यात आलंय. पहिल्या सीझनमध्ये प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारी, प्रसंगी डोळ्यांच्या कडा ओल्या करण्यास भाग पाडणारी आशू, सुजय, कैवल्य, मीनल, रेश्मा आणि अॅना ही मंडळी नव्या सीझनमध्ये आहेच शिवाय काही नवीन पात्रं देखील या मालिकेत प्रवेश करणार आहेत.

dil-dosti-dobara-1

हे सहा जण मुंबईत एकमेकांना कसे भेटतात आणि ‘खयाली पुलाव रेस्टॉरंटचा’ प्रवास कसा सुरु होतो त्याची गोष्ट या नव्या सीझनमध्ये बघायला मिळणार आहे. या कामाचा कोणताही पूर्वानुभव नसलेले हे सगळे हे काम कशाप्रकारे करतात ? यात त्यांना येणा-या अडचणींचा कशा प्रकारे सामना करतात ? रेस्टॉरंटमधल्या किती रेसिपीज् जमून येतात आणि किती बिघडतात ? हे बघणं मजेशीर ठरणार आहे. १८ फेब्रुवारीला प्रसारित होणा-या पहिल्या भागात या सर्वांच्या लहानपणाची गोष्ट बघायला मिळणार आहे. रविवारी १९ तारखेला दुपारी १ आणि संध्याकाळी सहा वाजता एका तासाच्या विशेष भागामधून ही गोष्ट ख-या अर्थाने सुरु होणार आहे.

dil-dosti-dobara-2

‘दिल दोस्ती दोबारा’ या नव्या को-या सिझनची निर्मिती संतोष कणेकर यांची अथर्व थिएटर्स अॅंड आर्ट ही निर्मितीसंस्था करणार आहे तर दिग्दर्शनाची धुरा अद्वैत दादरकर आणि स्वप्निल मुरकर सांभाळणार आहेत. कथा आणि संवाद सुदीप मोडक आणि अभिषेक खणकर यांचे असणार आहेत. समीर सप्तीसकरच्या संगीताने सजलेलं या नव्या मालिकेचं शीर्षकगीतही असंच फ्रेश असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या