नवीन सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर सेवेत, वीज ग्राहकांतून समाधान

सामना प्रतिनिधी । वडवळ नागनाथ

वडवळ नागनाथ येथील महावितरणची वाढलेली ग्राहक संख्या लक्षात घेऊन महावितरणने ‘दीनदयाळ उपाध्याय’ योजनेअंतर्गत येथील वटसिद्ध नागनाथ मंदिर परिसरात सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर (डीपी) मंजूर केला होता. या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरचे काम पूर्ण होऊन बुधवारी ट्रान्सफॉर्मरला विद्युत पुरवठा देवून ट्रान्सफॉर्मर सुरू करण्यात आल्याने या भागातील वीज ग्राहकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.

मागील बऱ्याच वर्षापासून या भागातील वीज ग्राहकांची संख्या वाढली असल्याने विद्युत दाब कमी (अत्यल्प) झाला होता. यामुळे ग्राहकांच्या घरातील ट्युब, फॅन, कुलर, फ्रिज, मिक्सर इत्यादी इलेक्ट्रीक वस्तू शोभेच्याच बनुन राहिला होत्या. ही बाब लक्षात घेऊन लघुअभियंता एन. जे. गिरी यांनी पाठपुरावा करून मंदिर परिसरात ‘दीनदयाळ उपाध्याय’ योजनेअंतर्गत नवीन सिंगल फेज (३ बाय २५ के.व्ही. एम्पायर ) ट्रान्सफॉर्मर मंजूर करून घेतला. या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर उभारणीसाठी मंजुरीनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होऊन बुधवार रोजी या सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरला विद्युत पुरवठा देवून ग्राहकांच्या सेवेत विद्युत प्रवाह सुरू करण्यात आला. यामुळे या भागातील वीज ग्राहकांतून समाधान व्यक्त करून महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ए.एस. आडगुबे,कनिष्ठ अभियंता एस.आर. माने, एन.जे. गिरी यांच्यासह एस.एस. वाघमारे, एल.एम. कदम, ए.एस. पठाण आदी कर्मचाऱ्यांचे आभार मानले जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या