नायरमध्ये त्वचाविकारांवर होणार झटपट उपचार

721

विविध त्वचाविकार, दोषांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना हेलपाटे पडू नयेत आणि झटपट उपचार मिळावेत यासाठी आणखी एका लेझर मशीनची खरेदी नायर रुग्णालय करणार आहे. त्यामुळे अशा रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. मशीनची संख्या वाढल्यामुळे रुग्णांना बराच वेळ रांगेतही उभे राहावे लागणार नाही.

पालिकेच्या केईएम, सायन यासारख्या मोठय़ा रुग्णालयांबरोबरच नायर रुग्णालयातही सर्वसामान्य, गरीब रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी येत असतात. यात मोठय़ा प्रमाणात विविध त्वचाविकारांचे रुग्णही असतात. मात्र, रुग्णांची संख्या जास्त आणि मशीनची संख्या कमी असल्यामुळे काही वेळा रुग्णांना रांगेत बराच वेळ उभे राहावे लागते. नंबर न लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णांना पुनः पुन्हा हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे रुग्णांचा वेळ आणि पैसा वाया जातो. त्यामुळे रुग्णांना हेलपाटे घालावे लागू नयेत आणि त्यांच्यावर वेळेत आणि लवकर उपचार व्हावेत म्हणून नायर रुग्णालय लवकरच विविध त्वचाविकारांवर यशस्वी उपचारासाठी आणखी एक लेझर मशीन खरेदी करणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या खरेदीला मंजुरी देण्यात आली. मे. सिक्नोव्हेशन प्रा. लिमिटेड  कंपनी ही मशीन नायर रुग्णालयाला पुरवणार असून त्यासाठी पालिका 33 लाख मोजणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या