महामारी इतक्यात संपणार नाही, कोरोनाचा नवा व्हेरिएंट जास्त संसर्गजन्य असणार

जगभर कोरोना रुग्ण संख्येत घट होत असताना डब्ल्यूएचओने कोरोना महामारी इतक्या लवकर संपणार नसल्याचा दावा केला आहे. अल्फा, बिटा, गामा, डेल्टा, ओमायक्रोनपाठोपाठ नवा व्हेरिएंट धडकणार असून तो जास्त संसर्गजन्य आणि घातक असेल, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

डब्ल्यूएचओमधील कोविड-19 तांत्रिक विभागाच्या प्रमुख मारिया वॉन केरखोवे यांनी हा दावा केला आहे. सध्या जगाची दमछाक करणारा ओमायक्रोन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरिएंट नाही. जगाला आणखी व्हेरिएंट्सचा धोका आहे. नजीकच्या काळात धडकणारा नवा व्हेरिएंट जास्त प्रमाणावर फैलावणार असून सध्याच्या व्हेरिएंट्सना मागे टाकणार आहे. तो सौम्य आणि गंभीर अशा दोन्ही स्वरूपांत असेल. इम्युनिटीवर मात करण्याची क्षमता त्यात असेल. या व्हेरिएंटच्या म्युटेशन्सबाबत आता सांगता येणार नाही, असे केरखोवे यांनी नमूद केले.

  • डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, मागील आठवडाभरात जगातील कोरोनाची रुग्ण संख्या आधीच्या आठवडय़ापेक्षा 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. तसेच कोरोना मृत्यूचे प्रमाण 7 टक्क्यांनी घटले आहे.
  • हिंदुस्थानात 15 ते 18 वर्षे वयोगटातील 1 कोटींहून अधिक मुलांनी लसीचे दोन्ही डोस, तर 5 कोटींहून अधिक मुलांनी लसीचा एक डोस घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी ही माहिती दिली.

नेजल स्प्रे आला; विषाणूचा दोन मिनिटांत खात्मा होणार

कोरोनाचा दोन मिनिटांत खात्मा करण्याची क्षमता असलेला पहिला नेजल स्प्रे आला आहे. मुंबईतील ग्लेनमार्क कंपनीने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी या स्प्रेचा वापर सुरू केला आहे. कॅनेडियन कंपनी सॅनोटीझच्या मदतीने बनवलेल्या व नायट्रिक ऑक्साईड असलेल्या ‘फेबी स्प्रे’च्या वापरासाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे.