जगाला नव्या विषाणूचा ताप; चीनमध्ये झुनेटिक लंग्याची उत्पत्ती; 35 रुग्ण आढळले

कोरोनापाठोपाठ मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाची चिंता कायम असतानाच चीनमध्ये ‘झुनोटिक लंग्या हेपिव्हायरस’ या नव्या विषाणूने डोके वर काढले आहे. चीनच्या शेडोंग आणि हेनान प्रांतामध्ये नवीन विषाणूचे 35 रुग्ण आढळले असून अनेक प्राण्यांनाही याची बाधा झाली आहे. या विषाणूचा संसर्ग प्राण्यांपासून मनुष्यामध्ये पसरत असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. या अनुषंगाने अधिक संशोधन करून यावरील औषधे आणि वैद्यकीय उपचार पद्धती विकसित केली जाणार आहे.

तैवानच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने (सीडीसी) चीनमधील नव्या विषाणू फैलावाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘झुनोटिक लंग्या हेपिव्हायरस’ या विषाणूचा संसर्ग ओळखण्यासाठी तसेच त्यावर लक्ष ठेवण्यासाठी तैवान ‘न्यूक्लिक ऍसिड’ चाचणी पद्धत सुरू करणार आहे. हा विषाणू मनुष्यासाठी किती धोकादायक आहे तसेच संसर्ग कशा प्रकारे पसरतो याचा सखोल अभ्यास सुरू आहे. याबाबत ठोस निष्कर्ष काढले जाईपर्यंत नागरिकांनी पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन तैवानच्या सीडीसीचे उपमहासंचालक चुआंग झेन-हसियांग यांनी केले आहे.लक्षणे काय आहेत?

35 पैकी 26 बाधितांमध्ये ताप, थकवा, खोकला, भूक न लागणे, मांसपेशींमध्ये वेदना, डोकेदुखी, उलटी यांसारखी लक्षणे आढळली आहेत. तसेच अनेक रुग्णांमध्ये पांढऱया रक्तपेशींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर यकृत आणि किडनी निकामी होणे यांसारखी गंभीर लक्षणेही दिसली.

चिचुंद्रीपासून फैलाव होत असल्याची शक्यता

नवीन लंग्या हेनिपाव्हायरसप्रामुख्याने चिचुंद्रीपासून फैलावत असल्याचा निष्कर्ष प्राथमिक सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे. पाळीव प्राण्यांसह 25 जंगली प्राण्यांवर याबाबत सर्वेक्षण करण्यात आले आहे. यादरम्यान नवीन विषाणूचे बकऱयांमध्ये 2 टक्के, तर कुत्र्यांमध्ये 5 टक्के रुग्ण आढळले आहेत.