विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीकरांना मुबलक पाणी

275

विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीकरांना पाणीपुरवठा करणाऱया वेरावली जलाशयाजवळ आणखी एक जलाशय बांधला जाणार आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. वाढती लोकसंख्या आणि वेरावली जलाशय जुने झाल्याच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पर्याय म्हणून नवीन जलाशय बांधावे यासाठी शिवसेनेने पाठपुरावा केला होता. शिवसेनेच्या या मागणीला यश मिळाले असून नुकत्याच झालेल्या पालिका महासभेत प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

मुंबई महापालिकेच्या के/पूर्व आणि के/पश्चिम विभागात विलेपार्ले पूर्व, अंधेरी पूर्व व पश्चिम आणि जोगेश्वरी पूर्व आणि पश्चिम हे भाग येतात. या भागातील रहिवाशांना वेरावली 1, वेरावली 2 आणि उच्चस्तरीय जलाशयातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र ही जलाशये 30 ते 40 वर्षे जुनी आहेत. त्यांची दुरुस्ती वेळोवेळी केली जात असली तरी दिवसेंदिवस वाढत जाणारी लोकसंख्या लक्षात घेता आणखी एका जलाशयाची आवश्यकता आहे. त्याचबरोबर विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरीकरांना 24 तास पिण्याचे पाणी पुरवण्याचे महापालिकेचे लक्ष्य आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आणखी एक जलाशय बांधावे अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनंत नर यांनी केली होती.

वेरावलीतील तीन जलाशयांची पाणी साठवण्याची क्षमता 6 एमजी, 9 एमजी आणि 1 एमजी इतकी आहे, मात्र वाढत जाणारी लोकसंख्या लक्षात घेता त्याहून जास्त क्षमतेचा जलाशय बांधला जाणार आहे. वेरावली जलाशयाजवळील मोकळय़ा जागेवर हा जलाशय बांधला जाणार आहे.

आपत्कालीन स्थितीत उपयोगी पडणार
वेरावलीच्या जलाशयांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी ही जलाशये काही वेळा बंद ठेवावी लागणार आहेत. त्याचबरोबर मुलुंड येथील जलाशयामधून पाणी वाहून आणणाऱया मोठय़ा क्षमतेच्या जलवाहिन्यांमध्ये काही बिघाड झाल्यास लोकांना देण्यासाठी अतिरिक्त पाणीसाठा असला पाहिजे. त्यावेळी गैरसोय होऊ नये आणि आपत्कालीन परिस्थितीत या भागातील रहिवासी पाण्याविना राहू नयेत म्हणून इथे नवीन जलाशय बांधणेही काळाची गरज आहे, असे नगरसेवक अनंत नर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या