नवीन वर्षाचे संकल्प

388

शिरीष कणेकर

[email protected]

पंतप्रधान नरेंद्र मोदी : नवीन वर्षात काय काय नवीन करीन, पण कुठल्याही नवीन घोषणेची सुरुवात ‘मेरे प्यारे देशवासियों’ अशी करणार नाहीत त्यामुळे देशभर हगवणीची साथ येते असे अमित शहा सांगत होते.
अमित शहा : मोदींशिवाय मी फुटबॉलएवढा मोठा झीरो आहे हे मी ओळखीन पण कोणाहीजवळ बोलणार नाही.
रामदास आठवले : डोनाल्ड ट्रम्पचा फोटो मी माझ्या रिपब्लिकन कार्यालयात लावीन व जाता येता त्याला हळद, कुंकू व फुलं वाहीन. फोटो बोलेल या विश्‍वासावर मी राजकारण करीन.
अरुण जेटली : पोटातली चरबी काढली पण एकूण चरबीचं काय, असं कपिल सिब्बल विचारण्यापूर्वी मी विचार करीन.
नवज्योत सिद्धू : कुठलाही नवीन पक्ष जॉइन करण्यापेक्षा कपिल शर्माचा तमाशा किफायतशीर आहे असा फेट्यातील मेंदूला विचार करायला सांगीन.
राखी सावंत : यंदा काय नवीन आचरटपणा करू हेच कळत नाही.
मल्लिका शेरावत : एका तरी टॉपच्या हीरोबरोबर काम करीन.
राहुल गांधी : मुंडावळ्या बांधून घोड्यावर चढीन किंवा काँग्रेसशी माझं लग्न लागलंय असं दिग्विजय सिंग यांच्यामार्फत जाहीर करीन.
कृपाशंकर शर्मा : काँग्रेस अधिवेशनात फुकट केळी वाटीन.
उमा भारती : ‘विझलेला निखारा’ हे निवडणूक चिन्ह मिळावं म्हणून दोन तासांचं उपोषण करीन.
नवाज शरीफ : पाकिस्तानी जनता पुन्हा हद्दपार करण्यापूर्वी मोदींच्या घरी ढोकळा व सोनपापडी खाऊन हिंदुस्थानविषयी दोन गोड शब्द बोलीन.
लालूप्रसाद यादव : मी पंतप्रधान कधी होईन हे विचारायला मी नितीशकुमार यांच्याकडे जाईन. हाच प्रश्‍न विचारायला त्याच वेळी ममता बॅनर्जी व मायावती तिथे आलेल्या असल्याने काही न बोलता रबडी खाऊन मी घरी परत जाईन.
लालकृष्ण आडवाणी : मी पक्षात आहे की नाही हे कोणाला विचारावं ते न उमगून माझी चिडचिड होईल.
विराट कोहली : आता अनुष्का शर्माचंच काय, कोणीही पटेल.
अभिषेक बच्चन : बाबांच्या आधीच मी निवृत्त होईन.
छगन भुजबळ : ‘बॉम्बे हॉस्पिटल’च विकत घेऊन टाकावं का? अन् ‘आर्थर रोड जेल’देखील!
आसाराम बापू : नवीन वर्ष तुरुंगातच काढीन म्हणतो.
मनेका गांधी : मला भटके कुत्रे प्रिय आहेत. मग काँग्रेसवाले का नाहीत, असं वरुण मला या वर्षात विचारणार.
शरद पवार : मोदी मला त्यांचे सल्लागार म्हणून नेमतील काय? नाहीतरी राष्ट्रवादीला भवितव्य नाहीच.
अनिल कपूर : पुत्री सोनम हिच्यात दम नाही हे मी ओळखलं असतं; पण मी ते पुत्र हर्षवर्धन याच्यापाशीही बोललो नसतो कारण त्याच्यातही दम नाही.
रोहित शर्मा : मी असाच बेभरवशाचा खेळ करीन, कारण त्यामुळेच मी इथवर वाटचाल केलीय.
लता मंगेशकर : मी रेडिओ किंवा टी.व्ही. लावणार नाही. वर कानात बोळे घालून बसेन.
देवेंद्र फडणवीस : पत्नीच्या गाण्यावर ठेका धरीन.
सलमान खान : राहुल गांधीच्या आधी लग्न करीन व यथावकाश बंधू अरबाजच्या मार्गाने जाईन.
कतरीना कैफ : भक्तिपटात ‘आयटम साँग’ करीन.
करीना कपूर-खान : हृतिक रोशनची ताजी नायिका सारा खान हिची सावत्र आई हे ऐकायला कानांना कसंसंच वाटतं.
अरविंद केजरीवाल : ‘बदनामी हुई तो क्या नाम ना हुआ?’ हे वचन दिल्लीभर लावीन.
जतीन परांजपे : निवड समितीचा सदस्य झाल्याचा फायदा घेऊन स्वत:ची एका तरी कसोटी सामन्यासाठी निवड करीन व वडील वासू परांजपेला टुक टुक करीन.
आशा भोसले : माझ्या ‘स्टेज शो’च्या जाहिरातीत माझ्या नावामागे ‘सूरश्री’ किंवा ‘गानकोकिळा’ऐवजी ‘नृत्याप्सरा’ असे लिहावे यासाठी मी अडून बसेन.
जया बच्चन : सतत नाक वर केल्यानं मला ‘स्पाँडिलायटिस’सारखे मानेचे विकार होतील.
रेखा : मी करण जोहरला लग्नाची मागणी घालीन; कारण म्हणच आहे ना, की ‘सटवाईला नव्हता नवरा आणि म्हसोबाला नव्हती बायको’.
डिनो मोरिया : जुगल हंसराज, विवेक मुशरान, राहुल रॉय, चंद्रचूड सिंग, दीपक तिजोरी यांना घेऊन मी ‘सदा बाद कलाकार संघ’ स्थापन करीन.
सुरेश कलमाडी : ‘पुणे श्री व्हाया दिल्ली’ असा किताब मला मिळायला हवा. तोपर्यंत अज्ञातवासात राहीन.
संजय राऊत : रविवार ‘सामना’तील उत्सव पुरवणीतील ‘रोखठोक’ या स्तंभाचं नाव बदलून ‘ठोकठोक’ असं ठेवीन.
शिरीष कणेकर : या वर्षीही मी मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणार नाही. कारण माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस व नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षयकुमार काळे यांच्यापेक्षा वाचकांना मी खूपच अधिक माहीत असल्याने मी निवडून येणार नाही. निवडून येतो तो वाचकप्रिय असे नवीन समीकरण आहे.

आपली प्रतिक्रिया द्या