नव्या वर्षाचे संकल्प

202
  • पुरुषोत्तम कृ. आठलेकर

निरोप घेताना आपण नेहमीच जरी भावुक होत असलो तरी येणाऱ्या नववर्षाचे आपण तितक्याच जोमाने, आनंदाने स्वागत करीत असतो. नव्या संकल्पना, आशाआकांक्षा याने आपला उत्साह अधिक वाढत असतो. राजकीय, सामाजिक, साहित्य, क्रीडा, मनोरंजन आदी क्षेत्रांत झालेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आगामी नववर्षात योग्य त्या रूपरेषा ठरविण्यास सज्ज होतो. भूतकाळाच्या पायावरच उज्ज्वल भविष्याचे इमले बांधले जात असतात. इतर क्षेत्रांतील तुलनात्मक दृष्टिकोनातून विचार करता राजकीय व आर्थिक क्षेत्रात नोटाबंदी व जीएसटीसारख्या धाडसी निर्णयांमुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. या निर्णयाचा दूरवर विचार करता ते नक्कीच चांगले असतील, पण सर्वसामान्य जनतेला नक्कीच त्रास सहन करावा लागला. भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान, डिजिटल अर्थव्यवस्था, स्वछता अभियान, मेक इन इंडिया, स्टार्ट अप यांसारख्या घोषणा व काही अंशी अंमलबजावणी बघता सर्वसामान्य जनतेच्या मनात काहीसा आशावाद निर्माण झाला असला तरी समाजात वाढणारी विषमता आगामी काळात भयावह आहे. जेव्हा आपण देश महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून विचार करीत असतो तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली वाढणारा स्वैराचार याचासुद्धा विचार होणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्या, पिकाला हमीभाव याभोवती फिरत असलेल्या राजकारणाला छेद देऊन शेतीपूरक व्यवसाय, पीक पेरणीतील बदल आत्मसात करण्याची गरज आहे. स्टार्ट अप योजनेतून तरुण पिढीचा कल स्वयंरोजगाराकडे वाढवणे गरजेचे आहे. त्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस माहिती-तंत्रज्ञानात होत असलेल्या प्रभावी बदलामुळे कुटुंबव्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहेत हे सत्य नाकारून चालणार नाही. संस्कारांवर व संस्कृतीवर परिणाम होऊ लागले आहेत. सोशल मीडियाच्या प्रभावामुळे समाजात चांगले तसे वाईट पडसाद उमटू लागले आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे लहान मुले जरी स्मार्ट झाली असली तरी कुटुंबातील संवाद हरवत चाललाय. नव्या वर्षात सतर्क राहून संकल्प केले पाहिजेत आणि कृतीत आणले पाहिजेत.

आपली प्रतिक्रिया द्या