ट्रम्प यांच्या शिक्षेचे कवित्व

>> हर्ष व्ही. पंत

अमेरिकेच्या राजकीय इतिहासात एखाद्या माजी अध्यक्षाला शिक्षा होण्याची घटना दुर्मीळ म्हणावी लागेल. आतापर्यंत अमेरिकेतील आजी-माजी उच्चपदस्थ व्यक्ती न्यायालयात दोषी ठरलेली नाही, परंतु माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी‘च्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले. वास्तविक आगामी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकनकडून सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून ट्रम्प यांच्याकडे पाहिले जात होते. अर्थात त्यांची अधिकृत घोषणा करणे बाकी आहे, पण या सर्व घडामोडींचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि त्यातही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणनीतीवर काय परिणाम होईल? हा प्रश्न आहे.

युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिकेच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या माजी राष्ट्राध्यक्षाला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा होण्याची अभूतपूर्व घटना नुकतीच घडली. जागतिक इतिहासाची पाने चाळल्यास ही घटना दुर्मीळ म्हणावी लागेल. अमेरिकेचा विचार करता या देशातील आजी-माजी उच्चपदस्थ व्यक्ती न्यायालयात दोषी ठरलेली नाही, परंतु अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ‘हश मनी‘च्या प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविले. वास्तविक, अमेरिकेमध्ये सध्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. आगामी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाकडून सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे पाहिले जात होते. किंबहुना लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणाही केली जाण्याची शक्यता आहे. असे असताना ‘हश मनी‘ प्रकरणाचा निकाल समोर आला आहे. या सर्व घडामोडींचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि त्यातही अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रणनीतीवर काय परिणाम होईल, याची चर्चा आता अमेरिकेसह जगभरात सुरू झाली आहे.

अनेकांच्या मते, ट्रम्प दोषी ठरत असतील तर ते मतदानाचा हक्क गमावतील, पण या निकालाचा त्यांच्या समर्थकांवर नकारात्मक प्रभाव पडेल की नाही, हे आताच सांगता येणार नाही. कारण या खटल्याचा निकाल जाहीर होताना मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांच्या वक्तव्याने समर्थकांचे किती समाधान होईल, हे सांगणे कठीण आहे, पण या खटल्याचा अंतिम निकाल 5 नोव्हेंबर रोजी लोकांकडून जाहीर केला जाईल. या प्रकरणात आतापर्यंत काय घडले हे जगाने पाहिले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापेक्षाही अधिक गंभीर खटले त्यांच्यावर सुरू आहेत. अनेक ‘स्विंग स्टेट’मध्ये म्हणजेच ज्या राज्यांतील मतदारांचा काwल अद्याप स्पष्ट नाही किंवा अधांतरी आहे, अशा ठिकाणी ट्रम्प यांना सद्यस्थितीत थोडीफार आघाडी आहे, पण ‘हश मनी‘ प्रकरणातील न्यायालयाच्या निकालामुळे या ‘स्विंग स्टेट‘मधील मतदारांचे मतपरिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दुसरीकडे, ट्रम्प समर्थक आणखी एकवटले जाऊ शकतात, असेही म्हटले जात आहे. कारण हा एक कट असल्याचे मानले जाते. सबब, ताज्या प्रकरणामुळे काठावरचा मतदार प्रत्यक्ष निवडणुकीत नेमका काय निर्णय घेतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर या घडामोडी घडत असताना अन्य कळीच्या मुद्दय़ांना कितपत स्थान मिळेल, हेदेखील पाहावे लागेल. अमेरिकेमधील यंदाच्या निवडणुकीमध्ये महागाई, स्थलांतर, चीनशी संबंधित आर्थिक धोरण, विविध युद्धांतील अमेरिकेची भूमिका आदी महत्त्वाचे मुद्दे आहेत. याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी काही भूमिका मांडल्या आहेत. त्यांचा मतदारांवर प्रभाव जाणवत असल्याचे दिसून आले आहे.

अमेरितील माध्यमांनी स्थानिक राजकारणाची दोन गटांत विभागणी केली आहे. डाव्या विचारसरणीच्या माध्यमांना ट्रम्प यांना झालेली शिक्षा म्हणजे राजकीय कारस्थान वाटत आहे आणि त्यामुळे मतदारांवर सखोल परिणाम होईल, असे त्यांना वाटत नाही. त्यांच्या मते, ट्रम्प यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या नकारात्मक बाजू लोकांना अगोदरपासूनच ठाऊक आहेत. तरीही ट्रम्प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून समोर येत असतील तर त्याचा अर्थ जनता त्यांना उणिवांसह स्वीकारण्यास तयार आहे, असे म्हणता येईल. या स्थितीमुळे ट्रम्प समर्थकांचे ध्रुवीकरण वेगाने होईल, असे या माध्यमांना वाटते. आणखी एक चर्चा म्हणजे ट्रम्प निवडणूक जिंकत असतील तर डेमोव्रॅटिक पक्षांच्या अनेक नेत्यांचे प्रलंबित खटले सुरू होऊ शकतात. म्हणजेच या कायदेशीर खटल्यांचा राजकीय शस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.

न्यायालयाच्या निर्णयामुळे पक्षांतर्गत विरोधक ट्रम्प यांच्याविरुद्ध एकत्र येऊन अधिक राजकीय हल्ले करू शकतात, असेही म्हटले जात आहे. प्रत्यक्षात विरोधक राहिलेत कोठे? असाही प्रश्न आहे. आतापर्यंत ट्रम्प यांना ज्यांनी घेरण्याचा प्रयत्न केला ते निवडणुकीच्या रिंगणाबाहेर फेकले गेले आहेत. भारतीय वंशाच्या निक्की हेली यांचेच उदाहरण पहा. एक वेळ हेली आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र हेली पराभूत झाल्याने रिपब्लिकन पक्षाला आता भवितव्य हवे असेल तर ट्रम्प यांच्याशिवाय पर्याय नाही, असे म्हटले जात आहे.

प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकन पक्षातील समर्थकांवर एवढा वचक बसविला आहे की, प्रदीर्घ परंपरा असणाऱया या पक्षाची स्वतःची ओळख पुसली जात आहे. रिपब्लिकन पक्ष हा संपूर्णपणे ट्रम्पमय होताना दिसत आहे. त्यामुळेच न्यायालयाने दोषी असल्याचे जाहीर केल्यानंतरही ट्रम्प यांना शिक्षा मिळेल का? त्यांना तुरुंगात जावे लागेल का? त्यांच्या उमेदवारीवर किती परिणाम होईल? याबाबत तर्कवितर्क मांडून खुद्द रिपब्लिकन पक्षातील नेतेच काही प्रश्न उपस्थित करताना दिसत आहेत.

अमेरिकन कायद्यानुसार पहिल्यांदा आरोप सिद्ध झाल्यानंतर दोषीला समाजाची सेवा करणे किंवा दंड यांसारख्या शिक्षा सुनावल्या जातात. डोनाल्ड ट्रम्प यांना त्याचा लाभ मिळू शकतो. त्यामुळे त्यांना तत्काळ तुरुंगवास होईल का, याबाबत सांशकता आहे. तसेच त्यांच्या उमेदवारीवरही परिणाम होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळेच ट्रम्प समर्थक या शिक्षेनंतरही फारसे अस्वस्थ झालेले दिसत नाहीत. स्वतः डोनाल्ड ट्रम्प तर या शिक्षेचा फुलटॉस चेंडू विरोधकांच्या अंगावर फेकण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाहू या, काय होतंय ते!
(लेखक किंगस्टन विद्यापीठ, लंडन येथे अध्यापक आहेत.)