पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणेवर विश्वास नाही! मैदानात न उतरताच न्यूझीलंडची दौऱयामधून माघार

श्रीलंकन क्रिकेट संघावर 2009 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानातील क्रिकेटच नव्हे तर क्रीडा क्षेत्र ठप्प झाले. आता न्यूझीलंडचा संघ पाच टी-20 व तीन वन डे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी पाकिस्तानात बऱयाच वर्षांनंतर गेला होता. पण न्यूझीलंड क्रिकेट संघाला सुरक्षेबाबत इंटेलिजेंस अलर्ट आल्यामुळे अखेरच्या क्षणी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने या दौऱयामधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेत एकही चेंडू टाकला गेला नाही. यामुळे पाकिस्तानातील सुरक्षा यंत्रणेवरही पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पाकिस्तान-न्यूझीलंड यांच्यामध्ये 17 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत तीन वन डे व पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार होती. दोन देशांमधील वन डे मालिका रावळपिंडी आणि टी-20 मालिका लाहोर येथे खेळवण्यात येणार होती, पण एकही चेंडू न टाकता अखेर ही मालिका रद्द करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंना पाकिस्तानातून हलवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची

आम्हाला दिलेल्या सल्ल्यानुसार दौरा सुरू ठेवणे शक्य नव्हते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डासाठी ही चांगली बातमी नाहीए. पण आमच्यासाठी खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी दौरा सोडून द्यावा लागत आहे, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे कार्यकारी सदस्य डेव्हिड व्हाईट यावेळी म्हणाले.

असुरक्षित वातावरण अन् इंग्लंड दौराही संकटात

अफगाणिस्तानात तालिबानने सत्ता स्थापन केली आहे. यामुळे पाकिस्तानमधील वातावरणही असुरक्षित झाले आहे. इंग्लंडचा संघही आगामी काळात पाकिस्तान दौऱयावर जाणार आहे. न्यूझीलंडने माघार घेतल्यानंतर इंग्लंड ऍण्ड वेल्स क्रिकेट बोर्डही कठोर पाऊल उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता इंग्लंडचा पाकिस्तान दौराही संकटात सापडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या