केन विल्यमसनचे दमदार द्विशतक, न्यूझीलंडची विक्रमी 715 धावसंख्या

26

सामना ऑनलाईन । हॅमिल्टन

कर्णधार केन विल्यमसनच्या नाबाद 200 धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱया दिवशी 715 धावांचा डोंगर उभारला. बांगलादेशची तिसऱया दिवसअखेरीस 4 बाद 174 धावा अशी अवस्था झाली असून आता त्यांचा संघ अजूनही 307 धावांनी पिछाडीवर आहे. न्यूझीलंडचा संघ चौथ्या दिवशी विजयासाठी प्रयत्न करील.

यजमान न्यूझीलंडने 4 बाद 451 या धावसंख्येवरून शनिवारी पुढे खेळायला सुरुवात केली. केन विल्यमसनने सुरुवातीला नील वॅगनर (47 धावा) याच्यासोबत 60 धावांची भागीदारी करीत किवींना 500 धावांचा टप्पा ओलांडून दिला. त्यानंतर केन विल्यमसनने बीजे वॉटलिंगसह 96 धावांची भागीदारी रचली. बीजे वॉटलिंग याने 36 धावा केल्या. मेहेदी हसनने त्याला बाद केले.

शेवटी केन विल्यमसन व कोलिन डी ग्रॅण्डहोम या जोडीने बांगलादेशच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई केली. केन विल्यमसनने 257 चेंडूंचा सामना करताना 19 नेत्रदीपक चौकारांसह नाबाद 200 धावा तडकावल्या. हे त्याचे दुसरे द्विशतक ठरले हे विशेष. कोलिन डी ग्रॅण्डहोम याने 53 चेंडूंत नाबाद 76 धावांची खेळी साकारली.

दृष्टिक्षेपात
न्यूझीलंडने कसोटीत पहिल्यांदाच 700 धावांचा टप्पा ओलांडला. याआधी त्यांनी 2014 साली शारजामध्ये पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक 690 धावा फटकावल्या होत्या.
केन विल्यमसनने 126 डावांमध्ये कसोटीत सहा हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. न्यूझीलंडसाठी सहा हजार धावा करणारा वेगवान फलंदाज म्हणून तो आता ओळखला जाईल.
कसोटी क्रिकेटमध्ये 20 शतके झळकावणारा केन विल्यमसन हा न्यूझीलंडचा पहिलाच फलंदाज ठरलाय. याआधी मार्टिन क्रो व रॉस टेलर यांनी प्रत्येकी 17 शतके झळकावली आहेत.
ऑफस्पिनर मेहेदी हसनच्या गोलंदाजीवर 246 धावांचा पाऊस पाडण्यात आला. यावेळी बांगलादेशसाठी कसोटीत सर्वाधिक धावा देणाऱया गोलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला.

आपली प्रतिक्रिया द्या