आता सहन होत नाही! अतिकामामुळे न्यूझीलंडच्या पंतप्रधान रडल्या, राजीनामा देण्याची शक्यता

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा करत सगळ्यांनाच धक्का दिला आहे. पुढच्या महिन्यात त्या पदावरुन पायउतार होणार आहेत. राजीनाम्याची घोषणा करताना जेसिंडा यांना अश्रू अनावर झाले. याशिवाय पुढची निवडणूकही लढणार नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.सहा वर्ष पदभार स्विकारल्यानंतर आता पुढे जेसिंडा निवडणुक लढणार नाहीत. त्यांनी आपल्या लेबर पार्टीच्या सदस्यांना सांगितले की माझा राजीनामा देण्याची वेळ आली.

जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितले की, ”मी आणखी चार वर्ष न्यूझीलंडचे नेतृत्व करण्यासाठी सक्षम नाही. आपले अश्रू रोखत त्या म्हणाल्या, पंतप्रधान म्हणून साडेपाच वर्ष खडतर होते. मीही माणूस आहे. आता मला पायउतार होण्याची गरज आहे. मला माहित आहे माझ्या या निर्णयानंतर राजीनामा देण्यामागचे खरे कारण काय होते वगैरे अशा अनेक चर्चा होतील. याचे कारण हेच आहे की सहा वर्ष लागोपाठ मोठ्या संकटांचा सामना केल्यानंतर आता थकले आहे. राजकारणी देखील माणूसच असतात. मला जेवढं शक्य होतं तेवढं केलं. जेवढे काळ नेतृत्व करु शकत होते तेवढा काळ केले. आता मला पद सोडण्याची वेळ आली आहे”.

न्यूझीलंडमध्ये लेबर पार्टीचे सरकार आहे. जेसिंडा अर्डर्न यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर नवीन नेता निवडण्यासाठी रविवारी पक्षांतर्गत मतदान होणार आहे. ज्या पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल ती व्यक्ती पुढील सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत पंतप्रधान असेल. अर्डर्न यांचा नेता म्हणून कार्यकाळ 7 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत.

जेसिंडा यांनी सांगितले की, त्यांना विश्वास आहे, न्यूझीलंड लेबर पार्टी आगामी निवडणूक लढेल. न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि वित्तमंत्री ग्रॅण्ट रॉबर्टसन यांनी सांगितले की, ते आगामी लेबर पार्टीचे नेत्याच्या पदासाठी निवडणुक लढण्यासाठी प्रयत्न नाही करणार,तर राजकीय टिकाकार बेन थॉमस यांनी सांगितले की, जेसिंडा यांच्या राजीनाम्याची घोषणा आश्चर्यकारक आहे, अजूनही त्या देशाच्या सर्वात आवडत्या पंतप्रधान मानल्या जातात. 2020 च्या निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या पक्षाचा पाठिंबा कमी झाला असला तरी.

26 जुलै 1980 ला न्यूझिलंडच्या हॅमिल्टनमध्ये जेसिंडा यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल रॉस आर्डन पोलीस अधिकारी होते. वयाच्या 18 वर्षापासूनच जेसिंडा राजकारणात आल्या. त्यांनी माजी पंतप्रधान हेलेन क्लार्क यांच्या कार्यालयात सहाय्यक रुपात काम केले होते. त्यानंतर टोनी ब्लेअर यांच्या सरकारमध्ये धोरण सल्लागार म्हणून काम करण्यासाठी त्या ब्रिटनमध्ये गेल्या होत्या. 2008मध्ये निवडणुका झाल्या आणि मार्च 2017 मध्ये लेबर पार्टीच्या उपनेत्या बनल्या. 2017 मध्ये त्या 37 व्या वर्षात सर्वात कमी वय असलेल्या न्यूझिलंडच्या पंतप्रधान झाल्या. कोरोना महामारी, दोन मस्जिदींवर दहशतवादी हल्ला, ज्वालामुखी विस्फोट अशा खडतर काळातही न्यूझीलंडचं नेतृत्व जेसिंडा अर्डर्न यांनी केलं आणि त्यांना जगभरात प्रसिद्धी मिळाली.