
आघाडीवीरांच्या निराशाजनक प्रारंभामुळे अडखळलेल्या हिंदुस्थानी फलंदाजीला सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदरच्या दमदार खेळीनंतरही 20 षटके खेळूनही 155 धावांपर्यंत मजल मारता आली. वन डेत सलग तीन पराभव झेलणाऱया न्यूझीलंडने रांची जिंकून संघाला विजयपथावर आणले. 52 धावांचा झंझावात आणि दोन फलंदाजांना यष्टिचीत करणारा डेव्हन कॉनवे न्यूझीलंडच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
न्यूझीलंडच्या माफक 176 धावांचा पाठलाग करताना इशान किशन (4), राहुल त्रिपाठी (0) आणि शुभमन गिल (7) यांच्या निराशाजनक खेळामुळे हिंदुस्थान 3 बाद 15 असा अडचणीत सापडला होता. पण सूर्यकुमारच्या 6 चौकार आणि 2 षटकारांच्या झंझावातामुळे हिंदुस्थानला विजयाची स्वप्ने पडत होती, पण तो बाद झाल्यावर हार्दिक पंडय़ा, दीपक हुडा, शिवम मावीने सावध फलंदाजी केली आणि विजयाचे अंतर आणखी वाढवले. अर्शदीप सिंहला चकवणारा फर्ग्युसनच्या माऱयाने हिंदुस्थानला पराभवाच्या दरीत ढकलले. तळाला वॉशिंग्टन सुंदरने 27 चेंडूंत पन्नाशी गाठून विजयासाठी प्रयत्न केले, पण ते अपुरे पडले.
त्याअगोदर नाणेफेक जिंकून हिंदुस्थानने न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. फिल अॅलन (35) आणि डेव्हन कॉन्वेने (52) जोरदार फलंदाजी करत 4 षटकांतच 43 धावांची सलामी दिली. त्यानंतर कॉन्वेने ग्लेन फिलिप्सबरोबर 60 धावा ठोकल्या, पण तळाला डॅरिल मिचेलच्या 30 चेंडूंतील 59 धावांच्या झंझावाताने न्यूझीलंडला 176 धावांपर्यंत मजला मारून दिली.
अर्शदीपची भरकटलेली गोलंदाजी
हिंदुस्थानच्या पराभवाला पुन्हा एकदा अर्शदीप कारणीभूत ठरला. त्याने डावातील 20 व्या षटकांत दिलेल्या 27 धावांमुळे न्यूझीलंडला 176 धावांपर्यंत मजल मारता आली. त्याच्या नोबॉलवर मिचेलने उत्तुंग षटकार ठोकला. मग पुन्हा दोन खणखणीत षटकार ठोकले. मग तिसऱया चेंडूवर आणखी एक चौकार खेचून तीन चेंडूंवर 23 धावा चोपल्या. हेच चार चेंडू हिंदुस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरले. तसेच अर्शदीपने फलंदाजी करतानाही ऐन मोक्यावर म्हणजेच 18 व्या षटकांतील पाच चेंडू वाया घालवत हिंदुस्थानचे विजयी लक्ष्य आणखी दूर नेले. 18 चेंडूंत 50 धावांचे आव्हान असताना 18 वे षटक निर्धाव गेले. येथेच न्यूझीलंडचा विजय निश्चित झाला. हिंदुस्थानने शेवटच्या 3 षटकांत 28 धावाच केल्या.